मुंबईवरील कोरोनाचे संकट गडद; दिवसभर 8 हजार 63 कोरोना रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत शनिवारी 6 हजार 347 वर असलेल्या रुग्णसंख्येत आज अचानक अडीच हजारांची वाढ होऊन ती 8 हजार 63 वर पोहोचल्याने मुंबईवरील कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. यापैकी 503 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 56 जणांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. मात्र, यातील 89 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. दरम्यान, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही दिवसभरात साडेसात हजार रुग्णांची वाढ झाली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची आकडेवारी मोठय़ा प्रमाणात वाढत असून कोरोना झपाटय़ाने पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत आज दिवसभरात 47 हजार 410 चाचण्या झाल्या. त्यातून 8 हजार 63 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 7 हजार 176 म्हणजे 89 टक्के लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. महापालिकेकडे सध्या 30 हजार 565 बेड उपलब्ध आहेत, तर 3 हजार 59 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकही ओमायक्रोन मृत्यू नाही   

मुंबईत कोरोना वाढत असला तरी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांनी संयुक्तपणे राबवत असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे मृत्यूचे प्रमाण घटले आहे. मुंबईत दिवसभरात 578 जण कोरोनामुक्त झाले असून सातव्यांदा एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही 94 एवढे मोठे असून कोरोनावाढीचा दर 0.38 इतके आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी 183 दिवसांवर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत आज ओमायक्रोनचा एकही रुग्ण सापडला नाही.

धारावीची रुग्णसंख्या दुपटीने वाढली; दादर, माहीमने शंभरी ओलांडली 

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणे असलेल्या दादर आणि माहीममध्ये रुग्णसंख्या वाढत असून पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची कोरोना संख्या आज दुपटीने वाढली आहे. धारावीत शनिवारी 24, दादरमध्ये 83 तर माहीममध्ये 80 रुग्ण सापडले होते. मात्र आज धारावीत रुग्णांची संख्या दुपटीने वाढून 60 झाली तर दादरमध्ये 102 तर माहीममध्ये 112 रुग्ण आढळले. दरम्यान, धारावीत सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला असून धारावीत 179, दादरमध्ये 442 तर माहीममध्ये 429 असे मिळून एकूण 1050 सक्रिय रुग्ण पालिकेच्या जी-उत्तर विभागात आहेत.