कोरोनाची धास्ती वाढली; रुग्णसंख्येसह मृतांचा आकडाही वाढतोय; देशभरात 24 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्गाला वेळीच आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचेही निर्देश राज्यांना देण्यात आले आहे. यानंतरही देशात आणि राज्यात रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशभरात 9 हजार 111 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे 9 हजार 111 नवे रुग्ण आढळले असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजार 313 झाली आहे. तर 6 हजार 313 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये असून तिथे 19 हजार 848 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून राज्यात 5 हजार 916 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिल्लीत 4 हजार 297 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांचा आलेख चढत असताना मृतांचा आकडाही वाढत आहे. गेल्या 24 तासात नोंद झालेल्या मृतांपैकी बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, तमिळनाडू येथे प्रत्येकी एक; महाराष्ट्रात दोन, दिल्ली, राजस्थान येथे प्रत्येकी तीन, उत्तर प्रदेशात चार तर गुजरातमध्ये सर्वाधिक सहा मृत्यू झाले आहेत. नेहमीचा पॉझिटीव्हिटी रेट 8.40 टक्के आहे, तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4.94 टक्के झाला आहे. सध्या रिकव्हरी रेट 98.68 टक्के आहे. आतापर्यंत 92.41 कोटी चाचण्या झाल्या आहेत.