कोरोना अख्ख्या मुंबईत पसरतोय! अंधेरीत सर्वाधिक रुग्ण, पालिकेकडून दोन हजार खाटांची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुक्त झालेल्या मुंबईत पुन्हा कोरोना पसरतोय. एन्फ्लुएंझाचा धोका वाढत असताना मुंबईत दररोज 100 हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या प्रत्येक वॉर्डात 5 ते 50 रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अंधेरीचे सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयामध्ये दोन हजारांवर बेड तैनात ठेवले आहेत.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तीन लाटा येऊन गेल्या. यानंतर कोरोना पूर्ण आटोक्यात आल्याने गेल्या काही दिवसांत एक आकडी  रुग्णसंख्या नोंद होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत जाऊन आता दररोज शंभरहून जास्त रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण वाढल्यास सुविधा देता याव्यात यासाठी बेड तैनात ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून सक्रिय रुग्णांची संख्या 2212 वर पोहचली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात 699 तर ठाण्यामध्ये 399 सक्रिय रुग्ण आहेत.

प्रत्येक बाधिताची जिनोम सिक्वेंसिंग

मुंबईत नव्याने वाढणाऱ्या कोरोनाचा नेमका व्हेरिएंट कोणता याचा शोध घेण्यासाठी पालिका प्रत्येक बाधिताची जिनोम सिक्वेंसिंग टेस्ट करुन घेणार आहे. यासाठी नमुने पुणे ‘एनआयव्ही’कडे पाठवण्यात येत आहेत.

कोरोना डॅशबोर्ड

  • आतापर्यंत आढळलेले रुग्ण  1156384
  • कोरोनावर मात केलेले रुग्ण 1136079
  • कोरोनामुळे झालेले मृत्यू     19754
  • एकूण सक्रिय रुग्ण     558
  • लक्षणे असलेले रुग्ण    32
  • रुग्णवाढीचे प्रमाण     0.0072 टक्के
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण    98.3 टक्के

असे आहेत रुग्ण

  • अंधेरी पश्चिम 61
  • अंधेरी पूर्व 49
  • ग्रँट रोड 49
  • एच/वेस्ट  51
  • कुर्ला     39
  • एस भांडुप      36