
देवेंद्र भगत
चीनसह परदेशातील काही देशांमध्ये मृत्यूचे थैमान घातलेल्या कोरोनाने गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत शिरकाव केल्यानंतर सर्वांना अक्षरशः धडकी भरली होती. वारंवार येणारा ताप, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास, अंगदुखी, थकवा अशी तीव्र लक्षणे दाखवल्यानंतर मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱया कोरोनाचा वर्षभरात ‘स्वभाव’ कमालीचा बदलला आहे.
लक्षणांमध्ये काहीसा बदल झाला असून लक्षणे सौम्य झाली आहेत. त्यामुळे उशिरा निदान होत आहे. यातच मागच्या काही दिवसांत लॉकडाऊन खुला झाल्याने गर्दीही प्रचंड वाढल्याने सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रसाराचा वेग वाढला. मात्र रुग्णसंख्या वाढली तरी मृत्युदर कमालीचा घटला आहे. मार्च 2020 मध्ये सुरुवातीला 12.39 असणारा मृत्युदर मार्च 2021मध्ये 0.26 तर एप्रिलमध्ये 0.04 पर्यंत खाली आला आहे.
मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत गेल्याने अनेक ‘हॉटस्पॉट’ निर्माण झाले. यामध्ये सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोनाने मृत्यू होणाऱयांचे प्रमाण जास्त होते. दैनंदिन रुग्णांची नोंद तीन हजारांवर गेली असताना दररोज 50 हून जास्त रुग्णांचा मृत्यू होत होता. त्यामुळे पालिकेचे आव्हान वाढले होते. यावेळी पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, औषधोपचार, स्क्रिनिंग, चाचण्या, आरोग्य शिबिरे, सर्वेक्षण जनजागृती मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. ज्येष्ठ आणि सहव्याधी असणाऱयांना कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे सहायक उपचार, ऑक्सिजन तपासणी-पुरवठा, खास सर्वेक्षण मोहीम राबवून नियोजनबद्ध काम करण्यात आले. त्यामुळे मृत्यूदर घटण्यास मदत झाल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
लक्षणात असा झाला बदल
सुरुवातीच्या काळात सर्दी, ताप, अंगदुखी, फुप्फुसात संसर्ग, थकवा अशी प्रमुख लक्षणे तीव्र स्वरूपात दिसत होती. आढळणाऱया रुग्णांमध्ये लक्षणे असणाऱया रुग्णांचे प्रमाण जास्त होते. मात्र आता 10 हजारांवर रुग्ण आढळत असले तरी 80 टक्क्यांहून जास्त जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत.
त्यामुळे त्यांना हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याचीही गरज भासत नाही, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. सध्या पूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रसाराचे प्रमाण जास्त दिसत असले तरी घटलेला मृत्यूदर दिलासादायक असल्याचे डॉ. भारमल म्हणाले.
दरम्यान, लक्षणांमध्ये आता जुलाब, पोटदुखी, मळमळ, उलटी, अंगदुखी, डोकेदुखीचा समावेश वाढला आहे. शिवाय लक्षणे उशिरा दाखवली जात आहेत. त्यामुळे वेळीच खबरदारी घेतली जात नसल्याने रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे तज्ञ सांगत आहे.
असा घटला मृत्यू दर
मार्च 2020 – 12.39 टक्के
एप्रिल 2020 – 7.38 टक्के
मे 2020 – 7.34 टक्के
जून 2020 – 5.40 टक्के
जुलै 2020 – 4.84 टक्के
ऑगस्ट 2020 – 3.96 टक्के
सप्टेंबर 2020 – 2.34 टक्के
ऑक्टोबर 2020 – 2.57 टक्के
नोव्हेंबर 2020 – 2.15 टक्के
डिसेंबर 2020 – 1.64 टक्के
जानेवारी 2021 – 1.62 टक्के
फेब्रुवारी 2021 – 0.72 टक्के
मार्च 2021 – 0.26 टक्के
एप्रिल 2021 – 0.04 टक्के
बाधित रुग्ण बरे होण्यासाठी लागणारा कालावधी कमी झाला आहे. याआधी रुग्णाला बरे होण्यास संपूर्ण 14 दिवस किंवा त्याहून जास्त दिवस लागायचे. मात्र आता आठवडाभरात रुग्ण बरे होत आहेत.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त





























































