सावधान! दोन्ही डोस घेऊनही कोरोनाचा धोका कायम, ठाण्यात 55 जण पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा नवीन व्हेरिेएंट ‘ओमिक्रोन’मुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता ठाणेकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. ठाण्यात 55 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, या 55 लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एका वृद्धाश्रमामध्ये हा कोरोना स्फोट झाला आहे. येथील 55 वृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व वृद्धांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या 55 लोकांव्यतिरिक्त आणखीन 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात एका दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. या सर्वांवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णांमधील 41 असे रुग्ण आहेत, ज्यांना आधीपासूनच काही आजार होते. तर यातील 30 रुग्ण असे आहेत, ज्यांच्याच कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसून आलेले नाहीत.

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती. या रुग्णाचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रोनची लागण झाली आहे की नाही? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र्रात मागील 24 तासात 832 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 33 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.