
कोरोनाकाळात वाहन उद्योगाला मोठा फटका बसला असून, त्याचा परिणाम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या उत्पन्नावरही झाला आहे. सरकारला अब्जावधी रुपयांचे उत्पन्न देणाऱया नगर जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उत्पन्न कोरोनामुळे तब्बल 60 टक्क्यांवर आले आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नगर व श्रीरामपूर या दोन्ही कार्यालयांचे 2018 मध्ये 108 कोटी 26 लाख 80 हजार 605 रुपयांचे उत्पन्न नोंदविले गेले होते. नवीन वाहनांची नोंदणी, दंड, विविध परवाने शुल्क यातून आरटीओला उत्पन्न मिळते. वाहनाच्या ‘एक्स शो-रूम’ किमतीच्या सात टक्के शुल्क वाहन नोंदणीसाठी आकारले जाते.
कोरोना काळापासून वाहनांच्या विक्रीमध्ये घट झाल्यामुळे परिवहन विभागाचे उत्पन्नही घटले. सन 2020 आणि 2021 या दोन वर्षांमध्ये बाइक आणि मोपेडच्या विक्रीमध्ये घट झाली. त्यामुळे नगरच्या परिवहन विभागाचे उत्पन्न सुमारे 40 टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
सन उत्पन्न
2018 108,26,80,605
2019 98,57,63,120
2020 91,93,19,317
2021 69,32,52,539



























































