
रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या महिलेच्या हातातील 1 लाख 35 हजारांच्या दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेण्यात आल्या आहेत. कोथरूडमधील देवयानी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी मोशी येथील 38 वर्षांच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार इंजिनिअर असून ते कुटुंबासह मोशी येथे राहण्यास आहेत. त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे 24 एप्रिलला देहुगावातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याठिकाणी सुविधा नसल्यामुळे त्यांनी आईला 13 मे रोजी कोथरूड येथील देवयानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्या आईवर उपचार सुरू होते. त्यानंतर 22 मे रोजी तक्रारदारांच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी घरी आणि हॉस्पिटलमध्ये सोन्याच्या बांगड्या शोधल्या. पण, त्या बांगड्या सापडल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.



























































