संभाजीनगर – कोरोना रूग्णांना आता होम आयसोलेशनची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे आणि सर्वांची व्यवस्था करणे अवघड होत चालल्यामुळे आता यापुढे 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशन करण्यास (घरी राहून उपचार घेण्यास) मनपा आरोग्य विभागाने मान्यता दिली असल्याचे आदेश संभाजीनगर मनपा प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांनी आज जारी केले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी व विषाणु संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाय योजना आखण्याचा एक भाग म्हणून सौम्य लक्षण असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तीसाठी घरी विलगीकरण कसे करावे यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

60 वर्षाखालील व्यक्तींना होम आयसोलेशन करण्यात यावे. 60 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना होम आयसोलन करायचे असल्यास फिजीशियनची शिफारस घेण्यात यावी. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, किडनीविषयक आजार नाहीत त्यांना होम आयसोलेखन करता येईल.

सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींंनी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक (फिजीशियन) एम.डी. (मेडीसीन) यांच्या अधिपत्याखाली उपचार घेत असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा रुग्णांची आवश्यकतेनुसार प्राथमिक तपासणी उदा. रक्त तपासणी, एक्स-रे, व आवश्यकतेनुसार अन्य तपासण्या कराव्यात. गरजेनुसार अशा रूग्णांना तत्काळ रूग्णालयात भरती करण्याची जवाबदारी ही खासगी वैद्यकीय व्यवसायिकांची राहील. अशा रुग्णांना खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी व्हिडिओ कॉल, फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट देऊन 10 दिवस मॉनिटरिंग करणे आवश्यक राहील. 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर नजिकच्या आरोग्य केंद्रास माहिती देणे आवश्यक आहे. रुग्णाच्या दैनंदिन तपमान व ऑक्सीजन तपासणीचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक असेल.

सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तीस होम आयसोलेखनमध्ये स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे. या खोलीत बाथरुम, टॉयलेट व्यवस्था असणे आवश्यक आहे. तसेच रुग्णांची 24 तास काळजी घेण्यासाठी केअर टेकर असणेही आवश्यक आहे. होम आयसोलेशन राहण्यासाठी रुग्णांचे प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. या सर्व बाबी पूर्ण होत असतील तर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होम आयसोलेशन करण्यासाठी परवानगी द्यावी. वैद्यकीय अधिकाऱ्याने होम आयसोलेशन केलेल्या रुग्णांची माहिती संबंधित नमुन्यामध्ये अहवाल तयार करुन मनपाच्या वॉररूमचे स्टाफनर्स गोविंद गिरी यांच्याकडे सादर करावा. त्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता पाटील यांचे नियंत्रण राहील.