
ब्लॅक फंगसनंतर आता कोरोना रुग्णांवर रेक्टल ब्लीडिंगचे (गुद्वाराद्वारे रक्तस्त्राव) सावट घोंगावत आहे. राजधानी दिल्लीतील दोन रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये रेक्टल ब्लीडिंगचे पाचहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, गंगाराम रुग्णालयामध्ये कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 20 ते 30 दिवसानंतर रेक्टल ब्लीडिंगची दिसून आले. विशेष म्हणजे आजपर्यंत रेक्टल ब्लीडिंग फक्त कमकुवत रोग प्रतिकारकशक्ती असणाऱ्या, कर्करोग किंवा एड्सची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत होते. परंतु हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णामध्ये रेक्टल ब्लीडिंग दिसून आले आहे.
रेक्टल ब्लीडिंग होणाऱ्या रुग्णाचे पोट दुखते आणि गुद्वाराद्वारे रक्त येते, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण आणि रुग्णावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या-औषधांचे (स्टेरॉईड) हे साई़ड इफेक्ट असावे, असे रुग्णालयाने म्हटले आहे.
याबाबत अधिक बोलताना इन्स्टिट्यूट ऑफर लिव्हर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी अँड पॅन्क्रियाटिकोबिलरी सायन्सेसचे चेअरमन प्रो. अनिल अरोडा यांनी सांगितले की, सायटोमेगालो व्हायरसशी संबंधीत हे इन्फेक्शन जवळपास 80 ते 90 टक्के हिंदुस्थानी नागरिकांमध्ये असते. मात्र आपली प्रतिकारशक्ती जास्त असल्याने याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु प्रतिकारशक्ती कमी झाल्यास याची लक्षणे दिसू लागतात.
एकाचा मृत्यू
गंगाराम रुग्णालयामध्ये 30 ते 70 वयोगटातील पाच रुग्ण दाखल झाले असून सर्व दिल्ली एनसीआरमधील आहेत. यातील दोघांना रेक्टल ब्लीडिंगचा अधिक त्रास होत होता. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.



























































