
देशात थैमान घातलेल्या कोरोनाच्या लाटेला ओहोटी लागली आहे. देशात दररोज आढळून येणाऱ्य़ा रुग्णसंख्येत मोठी घट होत असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे देशात 46 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात आणखी एक मोठा दिलासा म्हणजे कोरोनामुळे होत असलेल्या मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट शिगेवर पोहोचल्यानंतर देशात दररोज साडेतीन हजार ते साडेचार हजार या सरासरीने मृतांची नोंद झाली होती. एप्रिलच्या दुसऱ्य़ा आठवड्यापासून मृतांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली होती. तीन महिन्यांनंतर मृतांच्या संख्येत घट होऊन आकडा हजाराच्या खाली आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 46 हजार 148 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 58 हजार 578 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या 24 तासांत 978 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 13 एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृतांची संख्या 1 हजाराच्या आत नोंदवली गेली आहे.
राज्यात कोरोनाचे 9,974 नवे रुग्ण
राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,974 नवे रुग्ण आढळले. दिवसभरात 143 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1 लाख 22 हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात रायगड 672, पुणे जिल्हा 587, पुणे शहर 286, पिंपरी-चिंचवड 386, सातारा 929, कोल्हापूर 1525, सांगली 1205, सिंधुदुर्ग 508, रत्नागिरी 583 नवे रुग्ण आढळले. विदर्भ आणि मराठवाड्यातील रुग्णसंख्येत घट झाली आहे.
मुंबईतील 96 टक्के रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांचा दर 96 टक्क्यांवर गेला आहे. 746 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 13 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी 32 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. बाधितांचे प्रमाण मात्र 2.28 टक्के होते. मुंबईत एकूण बाधितांची संख्या सात लाख 20 हजारांपुढे गेली आहे. तर मृतांची एकूण संख्या 15 हजार 396 झाली आहे. एका दिवसात 1295 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सहा लाख 94 हजारांहून अधिक म्हणजेच 96 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या 8,582 झाली आहे.




























































