
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून आज राज्यात दिवसभरात 3 हजार 81 रुग्ण सापडले, तर मुंबईत 1 हजार 956 रुग्ण सापडल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. मात्र मोठय़ा प्रमाणात झालेले लसीकरण आणि होत असलेल्या चाचण्यांमुळे आज राज्यात आणि मुंबईत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी राज्यात 2 हजार 813 रुग्ण सापडले तर एका रुग्णांचा मृत्यू झाला तर दिवसभरात 3 हजार 81 नवे कोरोना रुग्ण सापडले तर एकही रुग्ण दगावला नाही. 1 हजार 323 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ती 13 हजार 329 वर पोहोचली आहे.
मुंबईत 24 तासांत 1 हजार सक्रिय रुग्णांची वाढ
मुंबईत लसीकरण आणि चाचण्या होऊनही बस, लोकल, बाजारपेठा यांच्यासह गर्दीच्या ठिकाणी मुंबईकर मास्क न लावता बेफिकीरपणे फिरत असल्यामुळे गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 1 हजार 956 नवे रुग्ण सापडले असून गुरुवारच्या तुलनेत 250 रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर गुरुवारच्या तुलनेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 24 तासांत 1 हजार रुग्णांची वाढ झाली असून ती 9 हजार 191 वर पोहोचली आहे. गुरुवारी मुंबईत 7 हजार 998 सक्रिय रुग्ण होते.



























































