कल्याणचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी

rajendra-devalekar

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर आणि शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर (60) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. गेल्या महिनाभरापासून निऑन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.

प्रभाग 16 मिलींदनगर – घोलपनगर येथून गेली चार टर्म मोठ्या मताधिक्याने ते निवडून येत होते. मलंगगड, दुर्गाडी मंदीर आंदोलनात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला. संघटनेसाठी झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता अशीच त्यांची ओळख होती. शिवसैनिकांच्या सुख दुःखात धाऊन जाऊन त्यांना सहकार्य करण्यात देवळेकर आघाडीवर असायचे. 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेने घसघशीत यश मिळवळ्यांतर त्यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कामाचा वेगळा ठसा उमटवला. संपूर्ण पालिका कार्यक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीतील सर्व शाखांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, महानगर प्रमुख विजय साळवी, महापौर विनिता राणे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या