
लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्यांसाठी स्वातंत्र्य दिनापासून लोकल सेवा सुरू केल्यानंतर आजपासून मुंबईकरांसाठी मैदाने, उद्याने, चौपाटय़ा खुल्या करण्यात आल्या आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या सुविधा खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आज याबाबतचे परिपत्रक काढले. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून अहोरात्र प्रयत्न सुरू असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या एक हजारांवरून आज 300 च्या खाली आली आहे. त्यात शनिवारपर्यंत एक डोस घेणाऱया मुंबईकरांची संख्या 59 लाख 24 हजार 198 वर तर दोन डोस घेणाऱयांची संख्या ही 19 लाख 91 हजार 554 वर पोहोचली आहे. त्यामुळे खबरदारी घेत मुंबई महापालिकेने कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्य दिनापासून सामान्यांसाठी लोकल सेवा सुरू केल्यानंतर आता दुसऱयाच दिवशी मुंबईकरांसाठी मैदाने, उद्याने आणि चौपाटय़ा सुरू करण्यात आल्या आहेत.
18 वर्षांखालील मुलामुलींना ओळखपत्र दाखवून मॉलमध्ये प्रवेश
राज्यातील 18 वर्षांखालील मुलामुलींना आता मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. या मुलांना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेनअंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा केली आहे. राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱया नागरिकांना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवावे लागणार आहे.
मुंबईत पहिल्या आणि दुसऱया लाटेदरम्यान महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांसह मुंबईकरांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य झाले. कोरोनावर नियंत्रण आणल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मिशन ब्रेक दी चेनअंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध खुले केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील 860 उद्याने, 318 मैदाने, 8 चौपाटय़ा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत खुली राहतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि उद्याने अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. याआधी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी होती.
































































