टी-20 वर्ल्ड कपची अदलाबदली? कोरोनामुळे हिंदुस्थानातील स्पर्धा आयोजनाबाबत शंका

हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट आली आणि आयपीएल स्पर्धेला ‘ब्रेक’ लागला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील उर्वरित लढती कुठे खेळवायच्या याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आयपीएलसोबतच हिंदुस्थानात या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱया टी-20 वर्ल्ड कपबाबतही प्रश्नचिन्ह यावेळी निर्माण झाले आहे. हिंदुस्थानात सप्टेंबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावरही संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. बीसीसीआय व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला गेल्यास यंदाचा टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात आणि 2022 सालातील टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थानात खेळवण्यात येऊ शकतो. पण सध्या तरी ही फक्त शक्यता आहे.

परिस्थितीवर सर्व काही अवलंबून

टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजन स्थळाबाबत आयसीसी जून महिन्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानातील तेव्हाची कोरोनाची स्थिती कशी असेल त्यानुसार आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आयोजनाबाबत निर्णय घेईल. पण सध्या तरी बीसीसीआयकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. जगातील धनाढय़ क्रिकेट संस्थेने ‘वेट अॅण्ड वॉच’चे धोरण अवलंबिले आहे.

कमी अवधी उरलाय

आयपीएलच्या उर्वरित मोसमासह टी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी यूएई, इंग्लंड, श्रीलंका हे देशही उत्सुक आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग सोपा नसेल. तसेच आयसीसी व बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास त्यांना आयोजनासाठी कमी अवधी मिळणार आहे. कोरोनामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देता येणार नाही. पण तरीही स्पर्धेशी संबंधित बऱयाच बाबी आहेत. याच कारणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर कोणता निर्णय घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मान्य करायला हवे

गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात येणार होते; पण कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2021 सालातील टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करायचे होते, पण 2021 सालातील टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाचा मान हिंदुस्थानला मिळाला होता. बीसीसीआयने त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे नाइलाजास्तव क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2020च्या बदल्यात 2022 सालातील टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन मिळाले. आता हिंदुस्थानातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन या वर्षी करता येऊ शकते; पण बीसीसीआयने त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवायला हवा. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे मान्यही करायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या