जगात कुठेही बालकांवर गंभीर कोरोना संक्रमणाचा डेटा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत लहान मुले सर्वात जास्त प्रभावित होतील, असे सांगितले जात आहे. मात्र एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या पुढील लाटेत लहान मुले अधिक संक्रमित होतील, अशी माहिती देणारा हिंदुस्थानात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. कोरोना स्थितीसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोरोना लाटेमुळे लहान मुलांना अनेक गंभीर आजार होणार असल्याची माहिती चुकीची असल्याचे सांगत देशातील धास्तावलेल्या पालकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच तर मुलांची काळजी घ्या, पण उगाच अति धास्ती करू नका, असा धीराचा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.

देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा कोणताही डेटा उपलब्ध नाही ज्यामध्ये कोरोना लाटेत मुले गंभीर संक्रमित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे,’ अशी माहिती देत डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले, ‘देशातकोरोनाच्या दुसऱया लाटेत संक्रमित होऊन रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 60 ते 70 टक्के मुलांना इतर आजार किंवा कमी प्रतिकारशक्ती होती. गंभीर नसणारी निरोगी मुले रुग्णालयात दाखल न होताही बरी झाली आहेत. हा अनुभव पाहता देशातील बालकांना कोरोनाच्या गंभीर संसर्गाचा धोका फारच कमी आहे, असे मला तरी वाटते. मात्र कोरोनाचा बहुरूपी स्वभाव पाहता आपल्याला स्वतःसह मुलांची काळजी मात्र घ्यावीच लागेल. तिसरी लाट आलीच तर दक्ष राहा, मुलांना जपा आणि कोरोनाला टाळा, असा सल्ला मात्र डॉ. गुलेरिया यांनी दिला.

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण झाल्यास किंवा लोकांमध्ये संसर्गाविरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यास या लाटा रोखल्या जाऊ शकतात. मात्र सध्या कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करणे अत्यंत गरजेचे आहे हे विसरून चालणार नाही’ – डॉ रणदीप गुलेरिया संचालक एम्स, दिल्ली

प्रतिबंधांकडे दुर्लक्ष केले की संसर्ग वाढून नवी लाट येते

कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली की लोकांमध्ये भीती निर्माण होते आणि त्यांच्या वागणुकीतही बदल होतो. ते कोरोना प्रतिबंधांचे काटेकोरपणे पालन करतात आणि कोणत्याही औषधांविना साखळी तोडण्यास मदत मिळते. पण जेव्हा अनलॉक होते तेव्हा लोकांना आता संसर्ग होणार नाही, असे वाटते आणि नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. याच बेफिकीरीमुळे पुन्हा एकदा रोगाच्या संसर्गाचा फैलाव होतो आणि त्याचे रुपांतर नव्या लाटेत होते, असा इशारा देत डॉ. गुलेरिया यांनी काही काळ तरी कोरोना प्रतिबंध पाळा आणि या महामारीची नवी लाट टाळा, असे मात्र आवर्जून सांगितले