केंद्र सरकारचा इशारा; 40 कोटी हिंदुस्थानींना कोरोनाचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दहशत लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. देशात अजूनही जवळपास 40 कोटी लोकांना म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश जनतेला कोरोनाचा धोका आहे. अगदी 6 वर्षांच्या मुलांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येक तीन व्यक्तींमागे एकजण विषाणूच्या निशाण्यावर आहे. चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणात हा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असतानाच इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वेक्षणातील धक्कादायक आकडेवारी जाहीर केली. यावेळी आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी देशात अजून कोरोनाचा धोका संपला नसल्याचे स्पष्ट केले. कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या तसेच लस घेतलेल्या जवळपास दोन तृतीयांश जनतेमध्ये कोरोनाविरुद्ध अॅण्टीबॉडी तयार झाली आहे. मात्र अजूनही जवळपास 40 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. ज्या भागांमध्ये बहुतांश लोकांमध्ये अॅण्टीबॉडी बनलेली नाही, त्या भागांमध्ये कोरोनाची पुढील लाट धडकण्याचा धोका आहे. सर्वेक्षणात सहभागी करून घेतलेल्या 6 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांमधील निम्म्याहून अधिक मुले सिरो पॉझिटीव्ह आढळून आली. निष्काळजीपणाला मात्र आता अजिबात जागा नसल्याचे दिसून आले, असेही डॉ. भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सर्वेक्षणातील निष्कर्ष

  • 6 ते 9 वर्षे वयोगटातील 57.2 टक्के मुलांमध्ये अॅण्टीबॉडी आढळली. म्हणजेच त्यांना कोरोना संसर्ग होऊन गेला होता.
  • 10 ते 17 वर्षे वयोगटातील 61.6 टक्के मुले, 18 ते 44 वर्षे वयोगटातील 66.7 टक्के, 45 ते 60 टक्के वयोगटामध्ये 77.6 टक्के आणि 60 वर्षांपुढील 76.7 टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडी बनली आहे.
  • ज्या लोकांनी लस घेतली नव्हती, त्यातील 62.3 टक्के लोकांना कोरोना संसर्ग होऊन गेला होता. तसेच लसीचा एक डोस घेतलेल्या 81 टक्के आणि दोन डोस घेतलेल्या 89.8 टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडी आढळली.
  • आरोग्य क्षेत्रातील 85.2 टक्के कर्मचाऱयांमध्ये अॅण्टीबॉडी आढळली, यातील 10 टक्के लोकांनी लस घेतली नव्हती.

धार्मिक असो वा सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रम करू नका!

कोरोनाच्या तिसऱया लाटेची टांगती तलवार असल्यामुळे देशात सध्या सार्वजनिक कार्यक्रम
टाळण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे. लोकांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच अन्य कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच लोकांनी प्रवासाला बाहेर पडले पाहिजे, असा सल्ला डॉ. बलराम भार्गव यांनी दिला आहे.

21 राज्यांतील 70 जिह्यांचा सर्व्हे

देशातील 21 राज्यांमधील 70 जिह्यांमध्ये जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हा चौथा राष्ट्रीय सेरो सर्व्हे करण्यात आला. सर्वेक्षणात प्रौढांबरोबरच 6 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांनाही सहभागी करून घेतले होते. यादरम्यान 28,975 सामान्य नागरिकांसह 7252 आरोग्य कर्मचाऱयांचे नमुने घेण्यात आले होते. देशात पहिला राष्ट्रीय सेरो सर्व्हे मे-जूनदरम्यान करण्यात आला होता. त्यात 0.7 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळली होती.