विकसीत केलेल्या कोरोना लसीबाबत रशियातच साशंकता; अद्याप लसीकरणाला सुरुवात नाही

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी जगात सर्वात आधी रशियाने लस विकसीत केली. क्लिनीकल चाचणी पूर्ण करण्याआधीच 11 ऑगस्टला त्याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे जगभरातून या लसीच्या प्रभावाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र, ही लस पूर्ण सुरक्षित असल्याचा दावा रशियाकडून करण्यात येत होता. मात्र, आता रशियातच या लसीच्या प्रभावाबाबत साशंकता असल्याचे दिसून येत आहे. या लसीची घोषणा घाईगडबडीत करण्यात आल्याची जाणीव रशियाला झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजूनही या लसीची मर्यादीत निर्मिती करण्यात येत असून फक्त चाचण्यांसाठी त्याचा वापर होत आहे. तसेच अद्याप नागरिकांना याचे लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत लसीची निर्मिती वाढवण्यात येईल आणि नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येईल, असे लसीची घोषणा करताना रशियाने स्पष्ट केले होते. मात्र, अजूनही या लसीचे मर्यादीत उत्पादनच सुरू आहे. त्यामुळे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. क्लिनीकल ट्रायल व्यतिरिक्त इतरांना अद्याप लस देण्यात आली नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना लस देण्यापूर्वी लसीच्या प्रभावाबाबत पुन्हा एकदा विचार करण्यात येत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

काही प्रातांमध्ये लसीचे नमुने पाठवण्यात आल्याची माहिती रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली आहे. मात्र, लसीबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. तसेच जनतेला लस कधी देण्यात येईल, याचीही माहिती त्यांनी दिलेली नाही. या लसीबाबत आपल्याला खूप कमी माहिती असल्याची टीका लसीच्या प्रभावाबाबत साशंकता व्यक्त करणाऱ्या तज्ज्ञांनी केली आहे. तर या लसीचे मर्यादीत उत्पादन ही समाधानाची बाब असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले. मर्यादीत उत्पादनामागे तांत्रिक कारण आहे की हा सरकारचा निर्णय आहे, याबाबत माहिती नाही. मात्र, ही समाधानाची बाब आहे. ही लस सध्या तरी फक्त क्लिनीकल चाचणीपर्यंत मर्यादीत ठेवावी. याचा प्रभाव आणि सुरक्षिततेची पूर्ण खात्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निर्मिती करावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डॉक्टर, आरोग्य सेवक, आजारी, वृद्ध आणि शिक्षकांना कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांना सर्वात आधी लस देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री मुराश्को यांनी सांगितले होते. मात्र, वितरण प्रणाली आणि आरोग्य सेवकांच्या प्रशिक्षणांमुळे लस देण्याचे काम मर्यादीत स्वरुपात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मास्कोमध्ये लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनीकल चाचण्या सुरू आहेत. त्यात 30 हजार जणांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी ही लस फक्त क्लिनीकल चाचण्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांनाच देण्यात येत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे रशियातच विकसीत झालेल्या लसीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या