Corona Vaccine – हिंदुस्थानचे पाऊल पडते पुढे, सिरम इन्स्टिट्यूट 1600 स्वयंसेवकांना देणार डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवघेण्या कोरोना विषाणूवर लस बनवण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस सुरुवात केली आहे. या दरम्यान, 1600 स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात येणार असून ही लस किती सुरक्षित आणि प्रभावी आहे हे पाहिले जाईल.

ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडियाने (डीसीजीआय) याच महिन्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस परवानगी दिली होती. त्यानंतर आता 18 वर्षांवरील 1600 स्वयंसेवकांना हा डोस देण्यात येणार आहे. देशातील 17 ठिकाणी ही चाचणी करण्यात येणार आहे.

क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री इंडियाने याबाबत बोलताना सांगितले की, स्वयंसेवकांना दोन डोस देण्यात येतील. यातील एक पहिल्या दिवशी आणि दुसरा 29 व्या दिवशी देण्यात येणार आहे. स्वयंसेवकांना 0.5 एमएलचा डोस देण्यात येईल. याआधी पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील दोन टप्प्यातील चाचणी घेण्यास डीसीजीआयने कंपनीला परवानगी दिली.

महाराष्ट्रामधील सेठ जीएस मेडिकल कॉलेज अँड केईएम हॉस्पिटल (मुंबई), बीजे मेडिकल कॉलेज आणि सासून जनरल हॉस्पिटल (पुणे), भारतीय विद्यापीठ डीम्ड यूनिवर्सिटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (पुणे), जहांगीर हॉस्पिटल (पुणे), टीएन मेडिकल कॉलेज आणि बीवाईएल नायर हॉस्पिटल (मुंबई), गवर्नमेंट मेडिकल कॉलेज (नागपूर) येथे ही चाचणी घेण्यात येणार आहे.