दुसऱ्या डोससाठी तातडीने 20 लाख लसी द्या! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात किमान 20 ते 22 लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. त्याची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवरही उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वस्तुस्थिती समजून घेत राज्याला जेवढय़ा डोसेसची आवश्यकता आहे ते तातडीने पुरवावेत. त्याचप्रमाणे परदेशातून लस आयात करण्यासाठी राज्यांत स्पर्धा होऊ नये यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय धोरण तयार करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे आज केली.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दृरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी आज संवाद साधला. त्याविषयी माध्यमांना माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सध्या अन्य राज्यांकडून जागतिक निविदा काढल्या जात आहेत. परदेशातील लस उत्पादकांकडून राज्यांना वेगवेगळे दर दिले जात आहेत. त्यामुळे यासाठी राष्ट्रीय धोरण आवश्यक असल्याची बाब केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सांगण्यात आली. त्याचप्रमाणे सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमातून लस दिली जाते. त्यासाठी राज्याच्या गरजेप्रमाणे लस पुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तातडीने केंद्र शासनाने 20 लाख डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात 1500 रुग्णांना म्युकर मायकोसीस औषधाची एमआरपी कमी करा

महाराष्ट्रात काळी बुरशी (म्युकर मायकोसीस) आजाराचे सुमारे 1500 रुग्ण असून त्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोनापश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकारशक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढताहेत. त्यावरील उपचारासाठीचे इंजेक्शनची किंमत जास्त असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी या औषधावरील छापील एमआरपी कमी करावी. या औषधाचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून द्यावा. ज्या कंपन्या त्याचे उत्पादन करतात त्यांना ते वाढविण्याचे निर्देश देण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे टोपे यांनी सांगितले.

मान्यतेसाठी रेमडेसिवीरचा साठा रखडला

महाराष्ट्र शासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी जागतिक निविदा काढून सहा कंपन्यांना 3 लाख व्हायल्स पुरविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या सहा कंपन्यांकडे साठा असूनही डीसीजीआयच्या मान्यतेशिवाय पुरवठा करू शकत नाही. त्यामुळे ही मान्यता तातडीने देण्याची विनंती केल्याचे टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्राची स्थिती सुधारतेय; केंद्रीयआरोग्यमंत्र्यांकडून काैतुक

राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्याहून कमी (0.8) आहे. देशाचा रुग्णवाढीचा दर दीड टक्के असून 36 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 31 वा क्रमांक लागतो. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून राज्याचा रिकव्हरी रेट 80 वरून 88 टक्के झाल्याचे टोपे यांनी सांगितले. यावर महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत असल्याचे सांगतानाच त्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील यंत्रणेचे काwतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या