चिंता वाढली! 18 राज्यांत नवा कोरोना!! जवळपास 200 जणांना विषाणूची लागण

कोरोनाची चिंता सध्यातरी कमी होण्याची चिन्हे नाहीत. देशात महाराष्ट्र, केरळ, तेलंगणासह 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा फैलाव वाढला आहे. या राज्यांमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमधून आलेल्या स्ट्रेनचे आतापर्यंत जवळपास 200 रुग्ण सापडले आहेत. नव्या स्ट्रेनचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देखरेखीची विशेष मोहीम सुरू केली आहे.

18 राज्यांमध्ये किती लोकांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे व ते लोक किती जणांच्या संपर्कात आले आहेत याची माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (एनसीडीसी) मागवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 18 राज्यांतील 194 लोकांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. यापैकी 187 लोकांमध्ये ब्रिटन कोरोना आढळला आहे, तर सहा लोकांमध्ये दक्षिण आफ्रिकन आणि एका नागरिकामध्ये ब्राझिलच्या स्ट्रेनचा संसर्ग आढळला आहे. नवीन स्ट्रेनचा फैलाव चिंता वाढवू लागल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांवर विशेष देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. 18 राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, पंजाब यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.
 कोरोनाविरोधातील लढय़ात सिरम इन्स्टिटय़ूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लसींचा आपत्कालीन वापर करण्यास केंद्र सरकारने 3 जानेवारीला मंजुरी दिली होती. त्याला अनुसरून 16 जानेवारीपासून देशव्यापी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत 1 कोटी 36 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे.

आज, उद्या लसीकरण नाही

देशात शनिवारी आणि रविवारी कोरोना लसीकरण होणार नाही. या दोन दिवसांत को-विन अॅप अपडेट केले जाणार आहे. 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा होणार आहे. यासाठी गंभीर व्याधी असलेले 45 वर्षांवरील लोक तसेच 60 वर्षांपुढील नागरिकांना को-विन अॅपवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठी अॅपमध्ये सुधारणा केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या