महामारीत 9 लाख कोटींचे नुकसान, देशाला आर्थिक पॅकेज व कमी व्याजदरांची गरज

कोरोना महामारीमुळे एप्रिल ते जून या अवघ्या तीन महिन्यांत देशाचे तब्बल 9 लाख कोटींचे नुकसान झाले. आधीपासून कोलमडलेली अर्थव्यवस्था कोरोनामुळे पूर्णतः ढेपाळली. देशाला आता 7 टक्के विकास दरासाठी आर्थिक पॅकेज आणि कमी व्याजदरांची गरज आहे. हे करताना जुन्या चुका पुन्हा करू नका, असा सल्ला नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी मोदी सरकार आणि रिझव्र्ह बँकेला दिला आहे.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनने (एआयएमए) सोमवारी व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पनगढिया यांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा तरतरीत बनवण्यासाठी उपाय सुचवले. कृषी क्षेत्राचा विकास दर 4 टक्क्यांपर्यंतही जाऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्याला सेवा आणि उत्पादन क्षेत्रात अधिक विकासाची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पनगढियांनी सुचवलेले उपाय व सल्ले
– बँकांचे रिकॅपिटलायजेशन आणि सरकारी बँकांच्या खाजगीकरणातून विकास दर उंचावेल.
– व्यापक खाजगीकरणासह निधी जमवण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचा उपयोग करण्याची आवश्यकता.
– सेवा आणि उत्पादन क्षेत्रात अधिक विकासाला वाव.
– अमेरिका व युरोपियन युनियनबरोबर मुक्त व्यापार कराराची गरज. शेजारी राष्ट्रांसोबत व्यापार सुरू ठेवा, मात्र चीनवर भरवसा ठेवू नका.

आपली प्रतिक्रिया द्या