‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेतोय’, सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या

1449
प्रातिनिधिक

मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे अशी सुसाईड नोट लिहून एका 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे घडली. आसाराम रामकिसन पोटे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

आसाराम पोटे यांना कोणताही आजार नव्हता. तसेच त्यांनी गेल्या काही दिवसात कोठेही प्रवास केलेला नव्हता किंवा ते कोरोनाग्रस्त व्यक्तीच्याही संपर्कात आले नव्हते. केवळ कोरोना विषयी बाहेर चर्चा ऐकून व सद्य परिस्थिती पाहून त्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. त्यापूर्वी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोटमधूनच ही बाब समोर आली.

सदर सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही’ असे त्यांनी या चिठ्ठीत लिहले आहे. त्यामुळे केवळ कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे या सर्व प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटने विषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या