
कोरोनाची दुसरी लाट जुलै महिन्यात ओसरेल आणि पुढच्या 6-8 महिन्यात तिसरी लाट देशात धडकेल अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र लहान मुले कोरोनाग्रस्त होण्याचे प्रमाण दोन राज्यात झपाट्याने वाढायला लागले असून यामुळे तिसरी लाट वेळेआधीच धडकली आहे का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात पहिल्या लाटेच्या तुलनेत लहान मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण बरेच वाढल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकात गेल्या 2 महिन्यात कोरोनामुळे बाधित झालेल्या लहान मुलांचे प्रमाण तब्बल 143 टक्क्यांनी वाढले आहे. कोरोनाबाधित मुलांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 9 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुले यात जास्त असल्याचं दिसून आलं आहे.
दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात गेल्या दोन महिन्यात 8 ते 15 वर्ष वयोगटातील 29 मुलं दाखल करण्यात आली होती. या सगळ्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना ऑक्सिजन सपोर्टची गरज होती. गेल्यावर्षी ऑक्सिजन सपोर्टची गरज असलेल्या या वयोगटातील मुलांची संख्या ही अवघी 8 इतकी होती. कर्नाटकात 18 मार्च ते 18 मे या काळात 9 वर्षाखालील कोरोनाग्रस्त मुलांची संख्या ही 39846 इतकी होती 10 ते 19 या वयोगटातील मुलांची आणि तरुणांची संख्या ही 1,05,044 इतकी होती.
महाराष्ट्रासह सहा राज्यांत कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय!
देशातील काही राज्यांत कोरोना महामारीचे संकट गंभीर होताना दिसत आहे. त्याचवेळी महाराष्ट्रास सहा राज्यांत कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. ‘मॅथेमेटिकल प्रोजेक्शन’च्या आधारे आयआयटीने केलेल्या संशोधनातून ही दिलासादायक माहिती पुढे आली आहे.
आयआयटीच्या संशोधकांनी कोरोनाच्या लाटांचा अंदाज लावण्यासाठी SUTRA नावाचे गणितीय मॉडेल तयार केले आहे. यानुसार महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील कोरोनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर असल्याच दिसून येत आहे. ‘मॅथेमेटिकल प्रोजेक्शन’च्या आधारे संशोधन करून तयार केलेल्या अहवालात तामीळनाडू, पंजाब आणि आसाममध्ये कोरोनाची दुसरी लाट येणे बाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
‘मॅथेमेटिकल प्रोजेक्शन’च्या आधारे केलेल्या या संशोधनात देशभरात मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसेल. तर जुलैच्या अखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट देशभरातून संपेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आयआयटीच्या संशोधकांनी वैज्ञानिक आकडेवारी आणि माहितीच्या आधारे कोणत्या राज्यात कोरोनाची कोणती लाट सुरू आहे याबाबत विश्लेषण केले आहे तसेच रुग्णवाढीचा अंदाज वर्तविला आहे. यानुसार पंजाब, तामीळनाडू, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये कोरोनाची दुसरी लाट येणे बाकी आहे.
या राज्यांतील रुग्णसंख्या घटली
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरयाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांमध्ये हळूहळू रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे.





























































