
राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी कोरोना लॉकडाऊननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नोक्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसे संकेत नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहेत.
राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू, असे टोपे म्हणाले. कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला अजून काही काळ कोरोनासोबत जगावे लागणार असून नियम-अटींसह शिस्त पाळावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यात विशेषज्ञांची जाणकणारी कमतरता टेलीआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार आहे, असे टोपे म्हणाले.
मृत्युदर एक टक्क्यावर आणण्याचे लक्ष्य
कोरोना रुग्णांचा मृत्युदर ही चिंतेची बाब असून हे मृत्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी टेली आयसीयू प्रकल्प उपयुक्त ठरत असून कोरोना मृत्युदर एक टक्क्यावर आणण्याचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱयांची संख्या वाढत असल्याचे टोपे यांनी सांगितले



























































