कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्ड धारकांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. यासाठी राज्यातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये दक्षता घेण्यात येणार आहे. रास्तभाव दुकानात शिधा वस्तुंचे वितरण करतांना लाभार्थ्याचे बायोमॅट्रीक पडताळणी न करता स्वस्त धान्य दुकानदारांना स्वतःचे आधार प्रमाणित करून धान्य वाटप करावे, असे आदेश आज अन्न नागरी पुरवठा विभागाचे एका आदेशाद्वारे काढले आहे.

कोरोना व्हायरसमुळे स्वस्त धान्य दुकानदारांना या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून ई-पॉझ मशीन तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याबाबत राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाचा दखल शासनाची घेतली असून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास्तव राज्यातील सर्व रास्तभाव दुकानामध्ये घ्यावयाची दक्षता संदर्भात अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक क्र. संकीर्ण – २०२० / प्र. क्र. ५६ / सं. क. मंत्रालय मुंबई यांचे १७ मार्च २०२० अन्वये परिपत्रक काढले असून परिपत्रकानुसार दुकानातून धान्य वितरण करतांना लाभार्थ्याची बायोमॅट्रीक पडताळणी न करता दुकानदारांनी स्वत:चे आधार प्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा आजपासून सुरू करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांचा ई – पॉझ मशीनवर अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही व त्यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल.

विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने दुकानात गर्दी होणार नाही तसेच धान्य घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांमध्ये उचित अंतर ठेवून धान्य वाटप रांगेत उभे राहून करावे, याची दक्षता दुकानदारांनी घ्यावी. जगभरात पसरलेल्या नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधीत रूग्णांची संख्या लक्षात घेता शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाचे सहसचिव स. सुपे यांच्या स्वाक्षरीने 17 मार्च रोजी परिपत्रक काढलेले आहे.

ई-पॉझ उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही- छगन भुजबळ

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करुन धान्य वाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नसल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ म्हणाले, रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉझ उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही. यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल. तसेच रास्तभाव दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षतादेखील घेण्यात यावी. याकरिता टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच धान्य घेण्यास आलेले लाभार्थी उचित अंतर ठेऊन रांगेत उभे राहतील, याचीही दक्षता रास्तभाव दुकानदारांनी घ्यावी.

कल्याणकारी संस्थांची संख्या मर्यादित असल्याने या संस्थांना गोदामातून देण्यात येणारे धान्य वितरीत करताना संबंधितांनी साबणाने, सॅनिटाईझरने हात स्वच्छ करुन ई-पॉझ उपकरणे हाताळण्याची काळजी घ्यावी. तसेच लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना धान्याचा अपहार, अनियमितता होणार नाही याची दक्षता रास्तभाव दुकानदारांनी घ्यावी. तथापि, वाटप केलेल्या धान्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदार यांची राहील. ही सुविधा 31 मार्च, 2020 पर्यंतच लागू राहील, असेही श्रभुजबळ यांनी सांगितले.