
जगभरात दहशत पसरवल्यानंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे हिंदुस्थान सरकारही सतर्क होत सर्व राज्यांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधीना कॉंग्रसची भारत जोडो यात्रा रद्द करण्याची विनंती केली आहे. यात त्यांनी भारत जोडो यात्रेमध्ये कोरोनाबाबतचे नियम पाळले जावेत आणि नियम पाळणे शक्य नसल्यास भारत जोडो यात्रा देशाच्या हितासाठी थांबविण्यात यावी असे पत्राद्वारे सांगितले आहे.
मनसुख मांडविया यांनी राहुल गांधीला पत्रात लिहीले आहे की, राजस्थानमध्ये सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये कोरोना नियमांचे कडक पालन व्हावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जावा. यात्रेत फक्त लस घेतलेल्या लोकांचाच सहभाग असेल याची काळजी घ्यावी. यात्रेत जोडल्या गेलेल्या लोकांना आयसोलेट करावे. पुढे त्यांनी लिहीले आहे की, भारत जोडो यात्रेमध्ये कोरोनाबाबतचे नियम पाळले जावेत आणि नियम पाळणे शक्य नसल्यास भारत जोडो यात्रा देशाच्या हितासाठी थांबविण्यात यावी.
राजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवजी पटेल यांनी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेतून पसरणाऱ्या कोरोना महामारीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले की, गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा सुरू असून देशातील विविध राज्यातील लोक सहभागी होत आहेत. अन्य राज्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे राजस्थानमध्ये कोरोना पसरण्याचा धोका आहे. यात्रेत सहभागी झालेल्या प्रवाशांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यात्रेतून परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. यावर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भारत जोडो यात्रेने मोदी सरकार घाबरले आहे. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप विविध प्रश्न उपस्थित करत आहे. पंतप्रधान मोदी गुजरात निवडणुकीत सर्व नियम पाळून मुखवटा घालून घरोघरी गेले होते का? असा प्रश्न विचारला आहे.




























































