रुग्णवाढ रोखण्यासाठी पालिकेचा ‘सप्टेंबर पॅटर्न’!

मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्याने पालिकेने नियमांच्या कठोर अंमलबजावणीसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोणत्याही क्षणी सुरू करता येईल अशी तयारी सुरू केली आहे. यासाठी कोरोना चाचणी अहवाल 24 तासांच्या आत देण्यासह पालिकेसह आणि खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी कोणत्याही क्षणी देता यावेत अशा स्थितीत तयार ठेवण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत. शिवाय दैनंदिन चाचण्या 16 ते 20 हजार करण्यात येणार असून एका रुग्णामागे 15 क्लोज काँटॅक्टला क्वारेंटाइन करण्यात येत आहे.

मुंबईत गेल्या दोन आठवडय़ांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारीअखेर 334 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट 900 हून जास्त नोंदवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत खासगी लॅब, पालिका दवाखाने, खासगी दवाखाने, कोरोना सेंटर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सप्टेंबरमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या अडीच हजारांवर गेली होती. यावेळी पालिकेने पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोना नियंत्रणात आला होता. त्यामुळे सद्यस्थितीत सप्टेंबरसारखी स्थिती नसली तरी खबरदारी म्हणून पालिकेने सर्व यंत्रणा तैनात करण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. रुग्णालये, जम्बो सेंटरमधील सर्व बेड, आयसीयू, ऑक्सिजन ऑक्टिव्ह करावेत, सुरक्षा-अग्निशमन यंत्रणा, कॅटरिंग सर्व्हिस सज्ज ठेवण्याचा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एकूण 517 कोरोना केअर सेंटर्स

पालिकेकडे एकूण ‘कोरोना केअर सेंटर – 1’ची संख्या 336 असून रुग्णसंख्या घटल्याने यातील फक्त 26 सुरू आहेत. यामध्ये 24 सेंटर्स ‘बफर’ म्हणजेच दोन दिवसांत सुरू करता येतील तर रिझर्व्ह प्रकारात 286 केंद्र असून ती 8 दिवसांत कार्यान्वित करण्यात येतील. तर ‘कोरोना केअर सेंटर-2’ची संख्या 181 असून यातील केवळ 7 सुरू असून 30 ‘बफर’ तर 144 रिझर्व्ह प्रकारात तैनात आहेत. उपलब्ध बेडपैकी 75 टक्के बेड आणि 75 टक्के आयसीयू रिक्त आहेत.

अशी होणार कार्यवाही

रुग्णांचे चुकीचे पत्ते आणि मोबाईल नंबरमुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काही रुग्ण सापडत नसल्याचे प्रकार समोर आले होते. हे सक्रिय रुग्ण समाजात फिरत राहिल्यामुळे कोरोना झपाटय़ाने वाढत होता. या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्णांचा पत्ता, मोबाईल नंबर, पिनकोडसह नोंदवून खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या सातही जंम्बो कोविड सेंटर्ससह लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर-1 आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी ‘कोरोना केअर सेंटर-2’ आवश्यकतेनुसार सुरू करण्यासाठी तयार ठेवण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. पालिकेकडे सुमारे 25 हजारांवर बेड, 1707 आयसीयू, 6869 ऑक्सिजन आणि 1033 व्हेंटिलेटर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या