नॉव्हेल कोरोना – विषाणू की जैविक अस्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बा. पटवर्धन

चीनसह संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. हा व्हायरस नेमका कुठून आणि कसा आला हा गंभीर विषय आहे. नॉव्हेल कोरोना हा विषाणू आहे की जैविक अस्त्र (बायोलॉजिकल वेपन) आहे यावरदेखील खल सुरू आहे. चीनने हिंदुस्थानला कायम कट्टर शत्रू मानले आहे. त्यातूनच अनेकदा आपला विश्वासघात केला आहे. हस्ते-परहस्ते तो आपल्याविरुद्ध जैविक अस्त्रांचाही वापर करू शकतो. तेव्हा हिंदुस्थाननेदेखील आपले जैविक युद्ध धोरण निश्चित करण्याची आवश्यकता आहे. भविष्यात जे होणारच आहे किंवा जे घडण्याची भीती आहे त्याचा विचार आताच करून योग्य उपाययोजना आधीच करणे हीच देशाची रणनीती ठरू शकते.

चीनसह संपूर्ण जगात भयकंप उडवणारा नवीन कोरोना व्हायरस हा साधा विषाणू आहे की चीनने कृत्रिमरीत्या बनविलेले जैविक अस्त्र आहे यावर जगभरातील संरक्षणतज्ञ आणि जैविक शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. या विषाणूमुळे चीनमध्ये जो हाहाकार उडाला त्यातून त्याची उत्पत्ती चीनच्या वुहान प्रांतातील जैविक प्रयोगशाळेतून झाली या चर्चेला उधाण आले होते. त्याला कारणही तसेच होते. वुहान विश्वविद्यालयात अत्यंत धोकादायक आणि तरल असलेल्या ‘पेथोजेन’वर संशोधन करणाऱ्या उच्च दर्जाचे सुरक्षा कवच असलेल्या एका जैविक प्रयोगशाळेची (बायोलॉजिकल लॅब) स्थापना करण्यात आली होती. त्याच प्रयोगशाळेतून ‘आऊटवर्ड व्हायरस इन्फिल्ट्रेशन’ प्रणाली द्वारा नॉव्हेल कोरोना व्हायरसची गळती झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रयोगशाळेची स्थापना चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सच्या व्हायरॉलॉजिकल इन्स्टिटय़ुट अंतर्गत करण्यात आली आहे. वुहानमध्ये अनेक प्रयोगशाळा अशा आहेत ज्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) जैविक युद्ध विभागाच्या नियंत्रणाखाली (बायोलॉजिकल वॉरफेयर डिपार्टमेंट) कार्यरत आहेत. त्यापैकीच एखाद्या प्रयोगशाळेतून नॉव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे.

विष, विषकन्या आणि विषाणू
तसा तर युद्धात जैविक अस्त्राचा प्रयोग प्राचीन काळापासूनच होत आहे. आतादेखील विकसित देश जर्म्स, विषाणू, पीक, जनावर व माणसाला घातक असलेल्या फुंगीच्या (बुरशी/मशरूम) स्वरूपात जैविक अस्त्रांची निर्मिती करतात. ख्रिस्तपूर्व 400 वर्षांपूर्वी पिण्याचे पाणी असणाऱ्या विहिरी, बावडय़ा, तलाव, सरोवर यांच्यात विष कालवणे, सर्पकन्यांचा वापर करणे किंवा बाणांच्या टोकांवर विष लावणे असे प्रकार सर्रास केले जात असत. 18व्या शतकात अमेरिकेतील ब्रिटिश साम्राज्यवादी आक्रमक टोळय़ा प्लेग, कांजण्या किंवा अन्य तत्सम विषाणूंनी भरलेल्या गोधडय़ा स्थानिक रेड इंडियन लोकांना वापरायला देत आणि त्यांना या रोगांच्या विळख्यात आणत. पहिल्या महायुद्धात जर्मनीने अँथ्रॅक्स, ग्लॅन्डर्स, कॉलरा, प्लेगच्या विषाणूंचा मारा रशियातील सेंट पिटर्सबर्गवर केला होता. युद्धानंतर लीग ऑफ नेशन्सने जैविक अस्त्रांच्या वापरावर बंदी घालणाऱ्या ‘जिनिव्हा प्रोटोकॉल’ला मान्यता दिली. तरीदेखील दुसऱ्या महायुद्धात, जर्मनी, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी प्लेग, सिफिलिस, पॅरालिसिस आणणाऱ्या बोटुलिनम टॉक्सिनचा सढळ वापर केला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर 22 वर्षांनी 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ‘बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन – मल्टीलॅटरल डिसआर्मामेंट ट्रीटी’ या करारांतर्गत वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, रासायनिक अस्त्रs, आण्विक अस्त्रs तसेच जैविक अस्त्रांची निर्मिती, वापर, साठा, खरेदी आणि विक्री तसेच हस्तांतरण यावर पूर्णतः बंदी घातली. 179 देशांनी या करारावर हस्ताक्षर करून त्याला मान्यता दिली आहे. अर्थात जैविक हल्ला झाला किंवा अशा एखाद्या रोगाची साथ तर त्यावर उपाय शोधण्यासाठी या सर्व देशांना ‘डिफेन्सिव्ह रिसर्च’ करण्याची मुभा या करारात देण्यात आली आहे. त्यामागील हेतू शुद्ध असला तरी त्याचा गैरफायदा घेऊन अमेरिकेने व्हिएतनाममध्ये एजंट ऑरेंज आणि इराकमध्ये डिपलीटेड युरेनियमचा वापर केला. बोस्नियातील युद्धात सर्बियाने सेब्रेनिकावर मारा केलेल्या, इराण – इराक युद्धात व सध्या सुरू असलेल्या सीरियातील युद्धात टाकलेल्या बॉम्बमध्ये बेंझिलेट नर्व्ह एजन्ट होते. 1995 मध्ये जपानमधील टोकियो येथील तीन सबवे स्टेशनवर ऑव्म शिनरीक्यो या दहशतवादी संघटनेद्वारा सारीन नर्व्ह गॅसचा वापर करून दहशतवादी हल्ला करण्यात आला होतो. त्यात 28 लोक मारले गेले होते. जैविक अस्त्रांचा प्रयोग 2012 मध्ये सीरियात नर्व्ह गॅसच्या स्वरूपात, 2017 मध्ये कौलालंपूरच्या विमानतळावर सारीन गॅसच्या माध्यमातून, 2018 मध्ये उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉन ऊनच्या भावाला मारण्यासाठी व्हीएक्सच्या रूपात करण्यात आला आहे. अगदी अलीकडे 2019 मध्ये रशियन लष्करी अधिकारी आणि त्याच्या मुलीला शक्तिमान नर्व्ह एजन्टच्या सहाय्याने सॅलिसबरी येथे मारण्यात आले.

या सर्व पार्श्वभूमीवर सध्या कोरोना विषाणूचा एकाएकी झपाटय़ाने झालेल्या प्रसाराबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. वुहान प्रयोगशाळेत चीन विकसित करीत असलेल्या कोरोना व्हायरस जैविक अस्त्राचा चुकून स्फोट झाल्यामुळे या विषाणूचा प्रसार झाला की चीनच्या जागतिक महाशक्ती बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावण्यासाठी चीनच्या शत्रूंनी चीनवर केलेला हा जैविक अस्त्र प्रहार आहे याबद्दलही संरक्षण तज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. चीन जर आपल्या शत्रूंवर हल्ला करण्यासाठी जैविक अस्त्र विकसित करू शकतो तर अमेरिकादेखील जॉर्जियामधील ल्यूगर प्रयोगशाळेत निर्माण होत असलेल्या ‘ट्रीट ऑर कील डय़ुएल युज बायोटेक्नॉलॉजी’चा वापर चीनविरुद्ध करू शकतो. काहींचा तर असा दावा आहे की, आपल्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी चीननेच स्वतः या जैविक अस्त्राचा प्रादुर्भाव केला, लाखो लोकांना त्याची लागण होऊ दिली आणि किमान लाखभर लोकांचा मृत्यू होईल असे पाहिले. काहींच्या मते पाश्चिमात्त्य हेरांच्या मदतीने चीनमधील जिहादी उईघर मुस्लिमांनी केलेले हे कृत्य आहे. अर्थात तूर्त तरी या सर्व शंका आहेत. त्यासर्वांचे विश्लेषण संरक्षण तज्ञ करीत आहेत. त्यातून नेमके काय ते सत्य भविष्यात बाहेर येईल.

नेदरलॅण्डमध्ये मध्यंतरी अनेक जनावरे अचानक एका अनामिक रोगाला बळी पडली. त्याचा शोध घेण्यासाठी त्याचा नमुना (कल्चर) कॅनडामधील विकीपेगस्थित नॅशनल बायोलॉजिकल लॅबोरेटरी म्हणजेच एनएमएल या प्रयोगशाळेत आणला गेला. या कल्चरला ‘कोरोना’ हे नाव देण्यात आले. या विषाणूचा जनावरांवर काय परिणाम होतो त्यावर कॅनेडियन संशोधकांनी सखोल संशोधन केले. त्यात इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस कोरोनाची लागण कोंबडय़ांना तर पोरसाइन डेल्टा कोरोनाची लागण डुकरांना होते असा निष्कर्ष निघाला. कॅनेडाच्या संशोधकांनी या विषाणूची मोठी साठवण (स्टॉक पाइलिंग) केली. असे म्हणतात की, मार्च 2019च्या मध्यात या महाभयंकर विषाणूंनी भरलेले कंटेनर्स कॅनडातून चीनला पाठवण्यात आले होते. अर्थात हे कितपत खरे, हे कंटेनर्स कोणी व कसे पाठविले याबाबत अद्याप अधिकृत उलगडा झालेला नाही. मात्र काही वर्षांपासून अतिगंभीर विषाणूंवर संशोधन करणारी चीन जैविक शास्त्रज्ञ डॉ. ईयोंग्युओ क्वी, तिचे पती आणि 26 विद्यार्थ्यांची कॅनडाच्या सरकारने या प्रयोगशाळेतून ऑगस्ट 2019 मध्ये अचानक हकालपट्टी केली हे लक्षात घेतले पाहिजे. त्याआधी झालेल्या चौकशीत डॉ. क्वी पती-पत्नीने 2017 ते 2019 यादरम्यान चीनमधील वुहान येथे सात वाऱ्या केल्याचे उघड झाले होते. बहुधा त्यामुळेच त्यांची हकालपट्टी केली असावी. चीनमध्ये आलेल्या या कंटेनर्समधील कोरोना विषाणूंपासूनच चीनने आपले जैविक अस्त्र निर्माण केले असावे असे मानायला बराच वाव आहे.

आधीच उपाययोजना करावी
वुहानमध्ये झालेला कोरोनाचा नरसंहार दुर्दैवीच आहे. त्याबद्दल कोणालाही दुःखच होईल. मात्र ‘नॉव्हेल कोरोना’ हा जैविक अस्त्र निर्माण करताना झालेला अपघात असू शकतो अशी वदंता आहे. त्याला कारणीभूत आहे ते चीनचे विस्तारवादी धोरण आणि विधिनिषेध न पाळता महत्त्वाकांक्षा रेटून नेण्याची मानसिकता. क्षेत्रीय महासत्ता होण्यासाठी चीनला प्रमुख अडथळा हिंदुस्थानच आहे. शिवाय आपला देश चीनसाठी कायम कट्टर शत्रूच ठरला आहे. त्यामुळे या जैविक अस्त्राची निर्मिती हिंदुस्थानविरुद्ध वापर करण्यासाठी होत होती का, हेदेखील पाहायला हवे. चीन भले स्वतः या अस्त्राचा वापर करून हल्ला करणार नाही. मात्र जिहाद्यांद्वारे अशाप्रकारचा हल्ला तो घडवून आणणारच नाही याची खात्री देता येत नाही. अर्थात कोरोनाच्या आक्रमणावर मात करण्यासाठी चीनने ज्यापद्धतीने उपाययोजना केल्या त्याचा धडा हिंदुस्थानने घेतला पाहिजे. हिंदुस्थाननेदेखील स्वतःचे जैविक युद्ध धोरण निश्चित करायला हवे. भविष्यात जे होणारच आहे किंवा जे घडण्याची भीती आहे त्याचा विचार आताच करून त्याला टाळण्यासाठी आणि यदाकदाचित असा ‘हल्ला’ झालाच तर त्याची तीक्रता कमी करण्यासाठी (मिटिगेशन) योग्य उपाययोजना आधीच करणे हीच खरी देशाची रणनीती ठरू शकते. त्यातच हिंदुस्थानचे सामरिक हित आहे.

[email protected]