21 दिवस प्रत्येक गाव, शहर बंद; घराबाहेर पडू नका, रस्त्यांवर दिसू नका – पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत आहे. देशभरातील रुग्णांचा एकदा 500 पार गेला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. आज रात्री 12 वाजल्यापासून पुढील 21 हा लॉकडाऊन असणार आहे. प्रत्येक गाव, शहर बंद राहणार असून लोकांनी घरात रहावे, रस्त्यावर उतरू नये असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यामुळे 15 एप्रिल पर्यंत घरातून बाहेर पडण्याचं विसरून जा.

आजच्या निर्णयाने देशव्यापी लॉकडाऊननं तुमच्या घराच्या दरवाज्यावर एक लक्ष्मण रेखा आखली गेली आहे. आपल्याला काहीही झाले तरी घरातून बाहेर पडायचे नाही. घराची लक्ष्मणरेखा पार केली नाही तरच कोरोनाचे संक्रमण थोपवता येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जगातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. मात्र साधन संसाधनांची वानवा नसतानाही हे देश या व्हायरसपुढे गलीगात्र आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी सध्या एकच उपाय आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, असे मोदी पुढे म्हणाले.

कोरोना संक्रमित व्यक्ती सुरुवातीला स्वस्थ असल्याचे दिसते, तो संक्रमित आहे हे समजतदेखील नाही. त्यामुळे सावधानता बाळगा आणि आपल्या घरातच राहा. कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहा. सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले, 21 दिवसांचा लॉकडाऊन हा मोठा काळ आहे. मात्र, तुमच्या सुरक्षेसाठी, कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे. हाच एकमेव मार्ग आहे, असेही ते म्हणाले.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसचं जाळं तोडण्यासाठी 21 दिवसांचा काळ महत्त्वाचा आहे, असेही मोदी आपल्या संबोधनात म्हणाले. देशाला वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकावर घरातून बाहेर पडण्याची बंदी लावली जात आहे. प्रत्येक भाग, प्रत्येक जिल्हा प्रत्येक राज्य आणि संपूर्ण देशात हा लॉकडाऊन घोषित केला जातोय, अशी घोषणा मोदी यांनी केली. बेजबाबदारपणा असाच सुरू राहिला तर देशाला त्याची किती किंमत चुकवावी लागेल, याचा अंदाजाही लावणं कठीण, असे पंतप्रधान मोदी रस्त्यावर उतरून गोंधळ घालणाऱ्या लोकांना म्हणाले.

घरात राहून त्या लोकांबद्दल विचार करा जे सध्या आपला जीव धोक्यात घालून एक एक जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र रुग्णालयात काम करत आहेत. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, पत्रकार यांच्यासाठी आपण प्रार्थना करा, असे आवाहन मोदी यांनी केले. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मोदी म्हणाले.

तत्पूर्वी संबोधनाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. देशावर संकट आले, मानवतेवर संकट आलं तर आपण सर्व देशवासिया एकत्र येऊन कसा त्याचा मुकाबला करतो हे ‘जनता कर्फ्यू’द्वारे देशाने दाखवून दिले, असेही मोदी म्हणाले.