Corona Virus शाहीन बागमधील आंदोलकांना हटविले, आंदोलनस्थळ निर्मनुष्य केले

1383

दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या 100 दिवसांपासून CAA म्हणजेच नागरिकत्व संशोधन कायदा आणि NRC म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात आंदोलन सुरू होतं. मंगळवारी सकाळी आंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलकांना तिथून हटवले आणि परिसर निर्मनुष्य केला. पोलिसांनी आंदोलकांनी उभारलेले तंबू उखडून फेकले आणि आंदोलकांना हटवायला सुरुवात केली. आंदोलकांनी त्याला विरोध करताच त्यांना ताब्यात घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दिल्लीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जमावबंदीही लागू करण्यात आल्याने अशा परिस्थितीमध्ये लोकांनी एकत्र जमणं हे कायद्याचे उल्लंघन आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे आंदोलकांनी एकत्र जमून आंदोलन करणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली होती.

कोरोनामुळे चार राज्यात कर्फ्यू; कठोरतेने अंमलबाजावणीचे निर्देश

ही बाब लक्षात घेता पोलिसांनी आंदोलकांना स्थळ सोडण्याची विनंती केली होती. ही विनंती न ऐकल्याने पोलिसांना बळाचा वापर करून आंदोलनस्थळ निर्मनुष्य करावे लागले. लोकांच्या जीवाचा प्रश्न असल्याने आम्ही कोणतीही जोखीम उचलायला तयार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आंदोलकांना तिथून हटवल्यानंतर हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. हा रस्ता मोकळा झाल्यास त्याचा फायदा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या आणि अँम्ब्युलन्सना होणार आहे.


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दिल्लीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीतील सातही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीविरोधात संपूर्ण देश एकवटला असून शाहीन बाग इथे आंदोलन करणाऱ्या अनेकांनी या जीवघेण्या आजाराविरोधातील लढाईला आपला पाठिंबा दिला होता. मात्र आंदोलकांनी शाहीन बाग इथे प्रातिनिधीक स्वरुपाचे आंदोलन सुरूच ठेवले होते. कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केल्याने फक्त 5 जण आंदोलनाला बसतील असा निर्णय घेण्यात आला होता. मंगळवारी या पाच जणींनाही हटवण्यात आले आणि आंदोलकांनी उभारलेले तंबू हटवून रस्ता मोकळा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

आपली प्रतिक्रिया द्या