‘कोरोना’चा प्रकोप वाढला; मुंबईत दोन संशयित रुग्ण आढळले

चीनमध्ये ‘कोरोना’चा प्रकोप वाढत असून यामुळे आतापर्यंत 26 जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे 830 जणांना या व्हारसचे संक्रमण झाले आहे. आता चीनमधून थायलंड आणि दक्षिण कोरियातही या रोगाचे संक्रमण होत आहे. अमेरिकेतही या रोगाचे संक्रमण झालेला एक रुग्ण आढळला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही या रोगाचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या रोगाचा हिंदुस्थानात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली, मुंबई विमानतळांसह देशातील सात विमानतळांवर चीनहून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येत आहे. याबाबतचे आदेश सर्व विमानतळांना देण्यात आले आहेत. तसेच चीनला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या प्रवाशांसाठी सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्लूएचओ) याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जागतिक आपत्कालीन स्थिती घोषित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे डब्लूएचओने म्हटले आहे. आपत्कालीन स्थिती घोषित झाल्यास या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्नांना गती देण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरस विषाणजन्य रोग आहे. तसेच याचे संक्रमण उंट, मांजर आणि वटवाघूळ यांच्यातही दिसून आले आहे. हा रोग मत्स्याहारामुळे पसरत असल्याचे डब्लूएचओने म्हटले आहे. सर्दी, खोकला, गळ्याची जळजळ, श्वास घेण्यास त्रास होणे,ताप ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यानंतर रुग्णाला न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. तसेच या रोगामुळे किडणीलाही धोका असतो. तसेच रुग्णांच्या फुफ्फुसालाही गंभीर रोगाच्या संक्रमणाचा धोका असतो. या रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी लस आणि औषधे यावर संशोधन करण्यात येत आहे. सध्या रोगाच्या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी रोगाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास तपासणीचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच तोंड मास्कने झाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या