मोठी बातमी – ‘अनलॉक-5’ची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली, कंटेंनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन राहणार सुरूच

देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या आणि मृत्यदर यात घट होत असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ‘अनलॉक-5’ची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत निर्देश जारी केले. त्यामुळे 50 टक्के सिटसह चित्रपटगृह, थिएटर आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी देणारा नियम आणि अन्य नियमावली आगामी महिन्यात देखील पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. तसेच कंटेंनमेंट झोनमध्येही पूर्वीप्रमाणे लॉकडाऊन सुरू राहणार आहे.

याआधी केंद्र सरकारने 30 सप्टेंबरला ‘अनलॉक-5’ची नियमावली जाहीर केली होती. यात अनेक गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय हवाई सफर सुरू करण्यात आला होता, मात्र शाळा, कोचिंग क्लास सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडे सोपवण्यात आला होता.

गुड न्यूज

दरम्यान, हिंदुस्थानला कोरोना विरुद्ध युद्धात यश येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच 22 मार्च नंतर पहिल्यांदा मृत्युदर दीड टक्क्यांहून कमी झाला आहे. मात्र कोरोना अजून संपलेला नाही, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने याआधी स्पष्ट केले आहे.

गाफील राहू नका

पंतप्रधान मोदी यांनीही सणासुदीच्या दिवसात बाजारात गर्दी होत असल्याचे पाहून चिंता व्यक्त केली होती. गाफील राहू नका असे ते म्हणाले होते. तसेच देशात अनेक लसींवर काम सुरू असून प्रत्येक देशवासियांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकार प्रतिबध्द असल्याचेही ते म्हणाले.

सक्तीने पालन

कंटेनमेंट झोनमध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत सक्तीने लॉकडाऊन लागू राहणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे सचिव राजेश भूषण यांनी याबाबत बोलताना सांगितले की, गेल्या पाच आठवड्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे. सध्या देशातील रिकव्हरी रेट 90.62 टक्के झाला असून हे चांगले संकेत असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या