
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा हाहाकार सुरू आहे. जगभरात आतापर्यंत 11 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढत आहे. कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगभरातील तरुणांसाठी एक पत्रक जारी केले आहे. डब्ल्यूएचओने तरुणांनाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्ध, लहान मुलं आणि कमजोर व्यक्तींना असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. तरुणांमध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असल्याने कोरोनाला घाबरायची गरज नाही, अशाही अफवा पसरल्या आहेत. मात्र वृद्ध आणि लहान मुलांएवढाच धोका तरुणांना आहे. तरुणांनी वृद्ध आणि कमजोर व्यक्तींपासून लांब राहावे असेही आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरलने याबाबत माहिती दिली आहे.
कोरोना बाधितांची ताजी आकडेवारी जाहीर करताना डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल म्हणाले की, आतापर्यंत जगात 2 लाख 10 हजार पेक्षा जास्त लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा 11 हजार पार गेला आहे. चीन पेक्षाही इटलीमध्ये मृतांचा आकडा अधिक झाला सून शुक्रवारी एकाच दिवशी 627 लोकांचा मृत्यू झाला. रोज नवीन समस्या समोर येत असून यावर डब्ल्यूएचओची नजर आहे, असेही ते म्हणाले.
कोरोनाचा सर्वाधिक धोका वयस्कर लोकांना होताना दिसत आहे. जगातील अनेक देशांज कोरोनाबाधित लोकांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. जवळपास सर्वच देशांमध्ये 50 पेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. या विषाणूच्या विळख्यात अडकण्याचा धोका तरुणांनाही आहे, असेही डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल म्हणाले.
आरोग्य कर्मचारी आणि टेस्टिंग लॅबची कमतरता
कोरोनामुळे जगावर वैश्विक संकट आले आहे. याचा सामना करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि टेस्टिंग लॅबची कमतरता जाणवत आहे. परंतु चीनने आवश्यक साधनसामग्री जगभरात पोहोचवण्यास होकार दिला आहे, असेही डब्ल्यूएचओने सांगितले. याची तयारी सुरू असून दुबईच्या भांडार गृहामधून याचा पुरवठा केला जाईल. आतापर्यंत जगभरात 15 लाख टेस्टिंग लॅब वाटण्यात आल्याचे, डब्ल्यूएचओने सांगितले. तसेच चीनमध्ये गेल्या 3 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले.

























































