
पुणे शहर आणि जिह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी पुण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता जुन्या विधानभवनाच्या सभागृहात होणाऱया बैठकीच्या तयारीसाठी प्रशासनाने आज दिवसभर बैठका घेतल्या. गेल्या तीन महिन्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या सुविधा तसेच नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सज्ज ठेवण्यात आली आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईमध्ये, विशेषतः धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले प्रयत्न आणि नियोजनाची देशात तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱयाला विशेष महत्त्व आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशात प्रतिदिन सर्वाधिक कोरोना टेस्ट पुण्यामध्ये केल्या जात आहेत. रुग्णांचा मृत्यूदर, रुग्णालयांची व्यवस्था या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आरोग्य खात्याचे प्रधान सचिव तसेच मंत्रालयातील अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.




























































