कोरोनामुळे पुन्हा वेतनकपातीचे संकट, इंजिनीयरिंग काॅलेजच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ

इंजिनीयरिंग काॅलेजच्या शिक्षकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या दुसऱयालाटेत या शिक्षकांवर पुन्हा वेतनकपातीचे संकट ओढवले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक इंजिनीयरिंग काॅलेजच्या संस्थाचालकांकडून शिक्षकांच्या वेतनाला कात्री लावण्यात येत आहे.

मागील वर्षभरापासून अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना अर्धवट तर काही ठिकाणी कपात करून वेतन दिले जात होते. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱया लाटेचा आधार घेऊन काही संस्थाचालकांनी पुन्हा वेतनकपात सुरू केली असल्याने मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी स्पष्ट केले. इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक मागील अनेक महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. मुंबई विद्यापीठाने यासाठी आदेश जारी करूनही महाविद्यालय प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही होत नाही. यामुळे येथील सर्व शिक्षकांनी मागील पंधरा दिवसांपासून ऑनलाइन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचीसुद्धा अद्याप दखल गेली घेतली गेली नसल्याचा आरोप नरवडे यांनी केला आहे.

कोरोनाच्या काळात शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण हे द्यावेच लागते. अशा स्थितीमध्ये शिक्षकांचे वेतन रोखून धरणे अथवा कपात करणे हे योग्य नाही. मुंबई विद्यापीठाने अशा महाविद्यालय प्रशासनाची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी एमफुक्टोने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या