#Coronavirus बापरे! कोरोनाचे ‘हे’ नवीन लक्षण अधिकच घातक, डॉक्टरही झाले हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा प्रकोप सुरू असून गेल्या काही दिवसांपासून दररोज 3 लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. नवीन स्ट्रेन अधिक वेगाने पसरत असून याच्या कचाट्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच येत आहेत. अशातच कोरोना विषाणू रुप बदलत असल्याने आव्हान अधिकच वाढले आहे.

कोरोनाची लक्षणे सामान्य सर्दी-खोकला-ताप याच्याशी मिळते जुळते असल्याने यातील फरक समजणे अवघड आहे. या दरम्यान एका अहवालामध्ये कोरोनाचे आणखी एक नवीनच लक्षण आढळून आले आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स अचानक कमी होत असल्याचे समोर आले असून यामुळे रुग्णाला थकवा जाणवत आहे. याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, दिल्लीतील आझाद नगर पारा रोडचे रहिवासी अलीम शेख (वय – 60) यांना थकवा जाणवत असल्याने त्यांनी रक्ताची तपासणी केली. तपासणीमध्ये त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या घटून 85 हजारांवर आल्याचे निदर्शनास आले. साधारणत: सुदृढ व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या दीड लाख ते साडे चार लाखांच्या मध्ये असते. मात्र अलीम शेख यांच्या रक्तातील प्लेटलेट्स आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असल्याचे तपासणीत उघड झाले.

#Corona रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेतोय? घाबरू नका; CDC च्या गाइडलाईन्सनुसार अशी घ्या काळजी

तपासणीनंतर डॉक्टरांनी शेख यांच्यावर औषधोपचार सुरू केला. परंतु 23 एप्रिलला त्यांना अचानक श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालात त्यांच्या रक्तात फक्त 20 हजार प्लेटलेट्स असल्याचे समोर आले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबियांनी दिल्लीतील अनेक रुग्णालयांच्या चकरा मारल्या. मात्र ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने उपचारांविनाच शेख यांचा मृत्यू झाला.

असाच काहीसा प्रकार बालागंजचे रहिवासी राजकुमार रस्तोगी (वय – 59) यांच्यासोबतही घडला. जास्त थकवा जाणवू लागल्याने त्यांनी रक्ताची तपासणी केली. तपासणीमध्ये त्यांच्या शरीरात फक्त 21 हजार प्लेटलेट्स असल्याचे स्पष्ट झाले. 16 एप्रिलला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर एका खासगी रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले तेव्हा त्यांना कोविड न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती राजकुमार यांचा मुलगा स्वप्निलने दिली. 17 एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 20 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला.

#Coronavirus खोकताना ‘ही’ 5 लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका, जीवावर बेतू शकते

डॉक्टरांचे काय आहे म्हणणे?

दरम्यान, आरएमएल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डॉ. विक्रम सिंह यांनी सांगितले की, थकवा किंवा अस्वस्थता व्हायरल आजाराची लक्षणे आहेत. कोरोना देखील एक व्हायरल आजार आहे. तसेच सामान्यत: प्रति एक लिटर रक्तात दीड लाख ते साडे चार लाख प्लेटलेट्स असतात. परंतु अनेकदा या प्लेटलेट्स 75 हजार ते 85 हजारांपर्यंत खाली येतात. डेंग्यूसारख्या आजारातही प्लेटलेट्स कमी होतात. परंतु थकव्यासह अस्वस्थता जाणवत असल्यास कोरोना चाचणी करून घ्या, असा सल्लाही डॉ. सिंह यांनी दिला. तसेच थकवा, अस्वस्थता जाणवत असतानाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांनीही सेल्फ आयसोलेशनमध्ये रहावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.