जे.पी.इन्फ्राने वाऱ्यावर सोडलेल्या 860 उपाशी बंगाली मजुरांना मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय

6279

मीरा-भाईंदर शहरात अव्वल असलेल्या जे.पी.इन्फ्रा या बांधकाम कंपनीने वाऱ्यावर सोडलेल्या 860 बंगाली मजुरांना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी न्याय मिळवून दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मजुरांची व्यथा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे व्यक्त करताच, या उपाशी मजुरांची दोन वेळच्या जेवणाची आणि पगाराची सोय झाली आहे.

मीरा-भाईंदर शहरात जे.पी. इन्फ्रा ही सर्वात मोठी बांधकाम कंपनी आहे. या कंपनीचे शहरात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मीरा रोड येथील हाटकेश परिसरात कंपनीची मुख्य साईट आहे. या साईटवर तब्बल 860 बंगाली मजूर रहात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्यामुळे सध्या काम बंद आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या या मजुरांचे दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाले होते. सदर बाब पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समजताच त्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला, आणि त्यांना याची माहिती दिली. याची दखल घेउन ठाकरे यांनी तात्काळ शिवसेना नेते विनायक राउत तसेच आमदार प्रताप सरनाईक आणि राज्याच्या कामगार आयुक्तांना याची माहिती देउन या मजुरांना तात्काळ मदत करा असे आदेश दिले. त्यानुसार सरनाईक यांनी काल रात्री प्रथम यांच्या भोजनाची सोय केली. तसेच आज दुपारी 12 वाजता या साईटवर जाउन येथील कामगारांना आपल्या दोन वेळेच्या जेवणाची सोय राज्य शासनाने घेतली असल्याची माहिती दिली. यावेळी सरनाईक यांनी जे.पी.इन्फ्राच्या मॅनेजमेंटला धारेवर धरून. या सर्व कामगारांसाठी दैनंदिन गरजेचे किमान 15 दिवसांचे अन्न-धान्य पुरवावे, असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या