कोरोनाची ऍपलला लागण, आयफोनचे उत्पादन घटले

335

चीनमधून फैलावलेल्या कोरोना व्हायरसची लागण ‘ऍपल’ या आयफोन कंपनीलाही झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या हुबेईजवळच आयफोनच्या निर्मितीचा कारखाना आहे. पण कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या काही दिवसांपासून हा कारखानाच बंद असल्याने आयफोनच्या उत्पादनात घट झाली आहे.

अमेरिका आणि युरोपनंतर चीन ही आयफोनच्या विक्रीसाठी तिसऱया क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे, पण कोरोनामुळे येथील ऍपलची 42 आऊटलेटस् बंद आहेत. त्यामुळे आयफोनच्या विक्रीतही घट पहायला मिळत आहे. याचा फटका गुंतवणूकदारांनादेखील बसला असून वर्षाच्या दुसऱया तिमाहीतील आर्थिक उद्दिष्ट गाठणे कंपनीला शक्य झालेले नाही.

चीनमधील परिस्थितीवर ऍपलने निवेदन केले असून ‘व्यवसायापेक्षा कारखाना आणि आऊटलेटस्मध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांचे आरोग्य याला आम्ही प्राधान्य देत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. पुरवठादार आणि सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आम्ही संपर्कात असून हळूहळू उत्पादन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

  • चीनमधील आयफोनच्या मागणीत घट झाली असली तरी इतर देशांत आयफोनला चांगली मागणी आहे.
  • 18 जानेवारीला ऍपलने सांगितल्याप्रमाणे दुसऱया तिमाहीतील महसूल 63 ते 67 अब्ज डॉलर्सच्या दरम्यान असेल. ऍपलचे दुसरे तिमाही 30 मार्च रोजी संपणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या