
चंद्रपूर शहरातील गर्दी कमी करण्यासाठी आता महापालिकेनं नवी शक्कल लढवली आहे. घरोघरी विविध रंगांच्या पासेस वितरित करण्यात आल्या असून, या पासवर आठवड्यातून एकदाच एका व्यक्तीला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आलीय. या पासवर त्याचे नाव आणि वार्डाचे नाव लिहिण्यात आले आहे. व्यक्ती ज्या प्रभागात राहतो, त्याच प्रभागात त्यानं खरेदीसाठी बाहेर पडायचं आहे. शहरात आतापर्यंत सुमारे 85 हजार घरांमध्ये या पासचं वितरण झालं असून, उर्वरित घरांत आज दिवसभरात त्या वितरित केल्या जाणार आहेत. उद्यापासून या पास लागू होणार आहेत. या पासशिवाय कुणी घराबाहेर आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण नाही. त्यामुळं शिथिलतेचा गैरफायदा लोक घेत आहेत. अनावश्यक गर्दी रस्त्यांवर दिसत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी महापालिकेनं ही शक्कल लढवली असून, याला किती प्रतिसाद मिळतो आणि किती गंभीर्यानं त्याची अंमलबजावणी केली जाते, हे एक-दोन दिवसात स्पष्ट होईलच. पण यशाबद्दल महापालिका खात्री बाळगून आहे.

































































