
कोरोनाच्या बिकट परिस्थितीत नागरिकांसह प्रत्येक स्तरातील व्यापारी, उद्योजक, विविध संघटनांची गैरसोय होऊ नये. कुठल्याही अडचणींमुळे त्यांच्या संतापाचा भडका उडू नये. त्यांना वेळीच योग्य तो मदतीचा हात मिळावा आणि पर्यायाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मुंबई पोलीस आता ऑनलाईन इनअॅक्शन होणार आहेत. यासाठी बिटपासून अपर पोलीस आयुक्तापर्यंत प्रत्येक स्तरावर व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे मुंबईत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून कधीही लॉकडाऊन घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेत नागरिकांच्या सेवेसाठी आणखी तत्पर राहता यावे यासाठी समाजमाध्यमाची मदत घेणार आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर नागरिक, व्यापारी, उद्योजक, विविध संघटना आदींची गैरसोय होऊ नये. त्यांना शासनाकडून वेळोवेळी जारी होणारी माहिती समजावी. त्याबाबत कोणतेही गैरसमज पसरू नयेत. तसेच नागरिकांच्या अडचणी वेळीच समजून त्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनदेखील पोलीस लॉकडाऊनमध्ये कार्यरत राहणार आहेत.
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही बंदोबस्त
- बीट, पोलीस ठाणे, एसीपी, डीसीपी आणि अपर पोलीस आयुक्त अशा प्रत्येक स्तरावर व्हॉट्सअपचे ग्रुप तयार होणार आहेत.
- प्रत्येक ग्रुपमध्ये 150 जणांचा समावेश.
- बीट स्तरावर नागरिकांच्या अडचणी जाणून त्यांना तत्काळ मदतीचा हात देणे. स्थानिक पातळीवर कोणताही गैरसमज पसरून परिस्थिती चिघळू नये यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
- डीसीपी आणि अपर पोलीस आयुक्त स्तरावरील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लोकप्रतिनिधी, मोठे व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यातील नामवंत व्यक्ती आदींचा समावेश असणार आहे. त्यांच्या शंकांचे तत्काळ निरसन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येईल.
























































