पालिका मुख्यालयाच्या आपत्कालीन कक्षातील दोघांना कोरोना; इमारतीचे निर्जंतुकीकरण, कक्ष सुरूच राहणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका मुख्यालयाच्या आपत्कालीन कक्षात काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना सेन्टरमध्ये दाखल करण्यात आले असून हा कक्ष आणि पालिका मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे महत्त्व लक्षात घेऊन हा कक्ष सील करण्यात आलेला नाही. कक्षाचे कामकाज सुरूच राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने पालिका मुख्यालयातील दुसर्या मजल्यावरील आपत्कालीन नियंत्रण कक्षात वाॅररुम स्थापन केला आहे. वाॅररुमची जबाबदारी सनदी अधिकारी अश्वीनी भिडे आणि आणखी एका अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. याच आपत्कालीन नियंत्रण कक्षातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी एक वरळीत तर दुसरा धारावीत राहणारा आहेत. आपत्कालीन नियंत्रण कक्षात 120 जण कार्यरत असून कोरोनाची लागण झालेले आणखी कोणाच्या संपर्कात आले याची माहिती घेण्यात येत असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे पालिका उपआरोग्य अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी सांगितले. दरम्यान,

आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षातच कोरेन्टाईन करण्यात आले आहे. आपत्कालीन विभाग आणि संपूर्ण इमारतीचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कक्षाचे महत्त्व लक्षात घेऊन हा कक्ष सील करण्यात आलेला नसून आवश्यक त्या मनुष्यबळासह सुरू ठेवण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाचे कामकाज मुख्य कक्ष आणि बॅकअप कक्ष असे विभागण्यात आले असून या दोन्ही कक्षाचे कामकाज सुरूच राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.