…तर हिंदुस्थान टी-20 वर्ल्ड कप आयोजनाला मुकणार

हिंदुस्थानात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याचा त्रास सर्वच स्तरांमधील जनतेला होत आहे. क्रीडाक्षेत्रही यापासून दूर नाही. याचे परिणाम सहा महिने दूर असलेल्या टी-20 वर्ल्ड कपवरही होताना दिसत आहेत. या वर्षी हिंदुस्थानात ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. पण कोरोनाचा वाढता कहर असाच सुरू राहिला तर ही स्पर्धा इतरत्र हलवण्याची योजना आयसीसीने बनवली आहे. हिंदुस्थानातील टी-20 वर्ल्ड कपसाठीचा ‘बॅक अप प्लॅन’ तयार असल्याचे आयसीसीचे प्रभारी सीईओ जेफ अलारडाईस यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

यूएई की श्रीलंका…

कोरोनामुळे हिंदुस्थानात टी-20 वर्ल्ड कप आयोजनात अडथळा आल्यास ही स्पर्धा इतरत्र खेळविण्यात येईल हे पक्के आहे. कारण सध्या तरी जगभरातील प्रत्येक देशांमध्ये कमीअधिक प्रमाणात कोरोना आहेच, पण तरीही श्रीलंका व यूएई हे पर्याय आयसीसीच्या दृष्टीने हितकारक ठरू शकतील. या दोन देशांपैकी एका ठिकाणी ही स्पर्धा खेळविण्यात येऊ शकते.

ऑस्ट्रेलियासोबत अदलाबदली

हिंदुस्थानातील 2020 सालामध्ये होणारा वर्ल्ड कप हा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता तो आता 2021 मध्ये खेळवण्यात येणार आहे. खरे तर 2021 सालामध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार होते, पण हिंदुस्थानने या वर्षी वर्ल्ड कप आयोजनाचा मान मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 2022 सालच्या टी-20 वर्ल्ड कप आयोजनपद गेले. आता हिंदुस्थानातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला नाही तर या वर्षी ऑस्ट्रेलियाकडे टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद देऊन 2022 सालामध्ये प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजनपद हिंदुस्थानला द्यायचे. अर्थात हीदेखील तारेवरची कसरत असणार आहे. कारण ऑस्ट्रेलियातील कोरोनाची परिस्थिती, टी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी त्यांनाही पुरेसा अवधी मिळायला हवा या बाबींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या