थंडीत वाढू शकतो कोरोना; सावध रहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळा जवळ आला आहे. या हिवाळ्याच्या काळात कोरोना वाढू शकतो असा इशारा पेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिला आहे. दसरा, दिवाळी या सणांमध्येही सर्वांनी काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी सोशल मीडियावरून आपल्या पाचव्या ‘संडे संवाद’ कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी संवाद साधला. कोरोना विषाणू हा श्वसनयंत्रणेवर हल्ला करणारा विषाणू आहे. असे विषाणू थंड वातावरणात अधिक वाढतात असे त्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये थंडीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले होते असे उदाहरणही त्यांनी दिले.

कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रक्रियेबद्दलही त्यांनी माहिती दिली. वेगवेगळ्या लसींच्या चाचण्या पहिल्या, दुसऱया, तिसऱया टप्प्यांत आहेत. त्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. त्यामुळे या लसींचा आपात्कालीन वापर सुरू करण्याबद्दल केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही असेही हर्ष वर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘दो गज की दूरी, मास्क है जरूरी’

उत्सवकाळात अनेकदा गर्दीचे प्रसंग येतात, पण या वर्षी ते टाळायला हवेत. लोकांचे जीव धोक्यात घालून उत्सव साजरे करा असे जगातील कोणताही धर्म सांगत नाही. त्यामुळे उत्सवाच्या काळात ‘दो गज की दुरी, मास्क है जरूरी’ या नियमाचे पालन करून बाहेर जाण्याऐवजी घरीच उत्सव साजरा करा असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.