येवा, हॉटेल आपलाच आसा! ग्राहकांच्या स्वागतासाठी `डिस्काऊंट’चा पुष्पगुच्छ तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या साडेसहा महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर मुंबईसह राज्यातील हॉटेल्स आणि बार सोमवारपासून सुरु होत आहेत. दरम्यान, मुंबईतील हॉटेल्समधील अपुरा कर्मचारी वर्ग लक्षात घेता मुंबईत सोमवारपासून फक्त 30 ते 40 टक्केच हॉटेल्स सुरू होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल्स व्यावसायिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनासह ग्राहकांना डिस्काउंटची ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेकांनी गेल्या सहा महिन्यांतील तोटा भरून काढण्यासाठी दरवाढीचा विचार सुरू केल्याची माहिती हॉटेल्स व्यावसायिकांनी दै.सामनाशी बोलताना दिली.

कोरोना महामारीमुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या साडे सहा महिन्यांपासून राज्यातील हॉटेल्स आणि बार बंद ठेवण्यात आले होते. आता ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सोमवारपासून हॉटेल्स आणि बार सुरू होत आहेत. त्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली असून या नियमानुसारच राज्यातील हॉटेल्स आणि बार सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबईसह राज्यातील हॉटेल्स व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र कोरोनाच्या काळात हॉटेल्समध्ये काम करणारा कामगार वर्ग हा आपल्या मूळ गावी परतला आहे. त्यामुळे सध्या हॉटेल्स व्यावसायिकांसमोर कर्मचारी वर्गांचा तुटवडा असल्याने मुंबईत केवळ 30 ते 50 टक्के हॉटेल्स सुरुवात होतील, अशी माहिती असोसिएशन ऑफ हॉटेल्स अॅण्ड रेस्टॉरंटचे (आहार) अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी दिली.

यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, राज्य सरकारने जी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आम्ही राज्यातील हॉटेल्स सुरु करणार आहोत. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. या नियमांची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याने आणि त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग लक्षात घेता सर्व हॉटेल्स सुरू करण्यात काही वेळ लागणार आहे. त्यामुळे येत्या 10 ते 15 दिवसांत जवळपास सर्व हॉटेल्स सुरू होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

मेन्यू मर्यादित असणार

सध्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक हॉटेल्स व्यावसायिकांनी आपल्या हॉटेल्समध्ये मिळणारा मेन्यू मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून येणाऱ्या ग्राहकांना चांगली सव्र्हिस देण्यात भर देणार आहे.

फुकटचे पदार्थ मिळणार नाहीत

हॉटेल्समध्ये गेल्यावर नेहमी ग्राहकांना कांदा, लोणचे किंवा इतर सॉस मोफत दिले जातात. पण आता कोरोनानंतर अनेक हॉटेल्समध्ये मात्र हे फुकटचे पदार्थ न देता फक्त ग्राहकांकडून ऑर्डर केलेलेच अन्नपदार्थ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ऑनलाइन मेन्यू कार्ड आणि बुकिंग

सध्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक हॉटेल्स व्यावसायिक ऑनलाइन बाबींवर अधिक भर देणार आहे. ज्यात प्रामुख्याने ऑनलाइन मेन्यू कार्ड, ऑनलाइन बिलसह बुकिंगसाठी देखील ऑनलाइन व्यवस्था करण्यात येणार आहे.