मुंबई वगळता राज्यातील नगरसेवक 17 टक्क्यांनी वाढणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
neta-symbolic

राज्यातील झपाट्याने वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरी विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत 17 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

महानगरपालिकेमध्ये सदस्य संख्या ही किमान 65 तर कमाल 175 सदस्य एवढी आहे. तर नगर परिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 आणि कमाल 65 इतकी आहे. महानगरांप्रमाणेच लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक बदल व नागरी समस्यांची सोडवणूक आणि विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सरकारचे मत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

या नव्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिकेच्या सदस्यांची संख्या 162 यावरून 173, नागपूर महापालिकेची सदस्य संख्या 151वरून 156, ठाणे महापालिकेत 131ऐवजी 142, पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128चे 139, कल्याण-डोंबिवलीत 122 चे 133, नवी मुंबईत 111चे 122 नागरसेवक होणार आहेत.

2011च्या जनगणनेनुसार सदस्यसंख्या निर्धारित करण्यात आलेली आहे. 2021च्या जनगणनेचा अहवाल कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे अद्याप आलेला नाही. या काळातील लोकसंख्यावाढीचा सरासरी वेग गृहीत धरून महानगरपालिका व नगर परिषदांच्या किमान सदस्यसंख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.