गुजरातच्या साबरमती नदीत आढळला कोरोना, दोन तलावांतही आढळले विषाणू

देशात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. तरी दररोज कोरोनाबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. आता गुजरातमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुजरातच्या साबरमती नदीत कोरोना विषाणू आढळला आहे. इतकेच नाही तर गुजरातच्या दोन तलावातही कोरोना विषाणू सापडला आहे.

गांधीनंगरच्या आयआयटीने अहमदाबादमधील साबरमती नदीच्या पाण्याचे नमूने घेतले होते. प्राध्यापक मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्याच्या 25 नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आढळले आहेत आणि ही बाब अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

साबरमती नदीतून 3 सप्टेंबर  ते 29 डिसेंबर 2020 दरम्यान दर आठवड्याला पाण्याचे नमूने घेण्यात आले होते. पाण्याच्या तपासणी दरम्यान त्यात कोरोनाचे विषाणू आढळले आहेत. इतकेच नाही तर कांकरिया तलावातून 549 तर चंदोला तलावातून 402 वेळा पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यातही कोरोना विषाणू आढळले आहेत.

पाण्यातही कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो असे संशोधनातून समोर आले आहे. म्हणून देशातील जलस्रोतांची तपासणी व्हावी अशी मागणी प्राध्यापक मनीष कुमार यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या