
भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची घोषणा करून महापालिकेची सत्ता हस्तगत करणाऱया भाजपने गेल्या चार-साडेचार वर्षांत शत-प्रतिशत भ्रष्टाचार केला. ठेके वाटून घेणाऱया दोन आमदारांनी महापालिका लुटून खाल्ली. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचारी महापालिका अशी पिंपरी-चिंचवड महापालिकेची ओळख झाली. जनतेच्या पैशांची घाणेरडय़ा पद्धतीने लूट होत असून, ही लूट शिवसेना सहन करणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना नेते, पुणे विभागीय संपर्क नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. श्रीमंत महापालिकेतील भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या पंपनीमार्फत स्मार्ट सिटी प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱयांच्या बैठका शुक्रवारी आकुर्डी येथे पार पडल्या. त्यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महापालिका निवडणुकीत आघाडी
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही, हे योग्य वेळी ठरविले जाईल. सन्मानाने जागा वाटप झाले तर आम्ही विचार करू, आघाडी होणार नाही असे आम्ही म्हणत नाही. सन्मानाने जागा वाटपाबाबत नक्कीच चर्चा केली जाईल, असेही खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
50 नगरसेवकांत महापौर बनवणार
खासदार राऊत म्हणाले, आमदार संख्या 55 असलेल्या पक्षाचा जसा मुख्यमंत्री झाला, त्याचप्रमाणे 50 नगरसेवक संख्या असलेल्या पक्षाचा महापौर होईल, अशी शिवसेनेची रणनिती आहे. ज्या पद्धतीने इतर शहरांत शिवसेनेच्या महापौरांनी काम केले, तसे काम येथेही करून दाखवू, असेही ते म्हणाले.



























































