अहमदपूर – पावसाअभावी शेतकऱ्यांचे पांढरे सोनं संकटात; उत्पन्न घटण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन-तीन वर्षापासून नगदी पैशाचे पिक म्हणून अहमदपूर तालुक्यातील शेतकरी कपाशीची लागवड करीत आहेत. पांढर सोनं म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कपाशीला शासन दरबारी दरही चांगला मिळत असल्याने लागवडीत वाढ झाली असून यावर्षी त्याचे ऐन बोंडे परिपक्व होण्यापूर्वीच पावसाच्या उघडीपीमुळे ते पिवळे पडून गळून पडत असल्याचे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अहमदपूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर दऱ्यात विसावला असल्यामुळे येथील शेती ही बहुतांशी खडकाळ, मुरमाड व हलक्या प्रतीची आहे. यामुळे येथील जमिनीला वरवर पडत असलेल्या पावसाची अत्यंत आवश्यकता भासते. परंतू यावर्षी नेमके पिक बहरात येतानाच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या उत्पन्नात घट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

यावर्षी खरीपाच्या पेरणीपासून तालुक्यात पाऊस पिकांना पाहिजे त्या प्रमाणात पडत गेला. त्यामुळे खरिपातील सर्वच पिकांची वाढ चांगल्या प्रकारे झाली. सोयाबीन, कापूस, तुर, मुग, उडीद आदी पिके जोमाने वाढली. मुग काढणीच्या वेळेस तर सतत 10-12 दिवस पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मुगाचे पीक काढणी वाचून हातातून गेले. अतोनात नासाडी झाली. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा मोठा खंड पडला असून  शुक्रवारी पडलेल्या पावसाच्या शिडकाव यामूळे थोडेफार जीवदान मिळेल अशी आशा वाटत असली तरी तीव्र उन्हामुळे जैसे थे परिस्थिती दिसत आहे, तर कपाशीचे बोंड भरण्याच्या ऐन कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने सध्यातरी शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कपाशीच्या उत्पन्नात 40-50 टक्के घट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

screenshot_2020-09-12-17-42-18-136_com-google-android-gm

एक एकर कपाशीसाठी शेतकऱ्यांना दोन हजारांचे बियाणे, लागवड व खुरपणीसाठी तीन हजार रु., जवळपास पाच हजारांचा रासायनिक खत, अंतर मशागतीसाठी कुळवाच्या तीन-चार पाळ्या, व किटक नाशकाच्या सहा-सात फवारण्या असा एकुण अठरा ते वीस हजार रु. खर्च झाला असून पावसाअभावी तो खर्चही पदरात पडतो का नाही अशी खंत हडोळती येथील शेतकरी कपाशी उत्पादक निवृती कांबळे यांनी दै. सामनाशी बोलताना व्यक्त केली.