देशात वाघ वाढले! मध्य प्रदेशने कर्नाटकला मागे टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानातील अभयारण्ये वाघांसाठी ‘नंदनवन’ ठरली असून 2006नंतर वाघांची संख्या दुपटीने वाढली आहे. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ‘2018मध्ये झालेल्या हिंदुस्थानातील वाघांच्या गणनेचा अहवाल’ जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार देशात 2 हजार 967 वाघ आहेत. 2006नंतर वाघांची संख्या दुपटीने वाढली आहे. 2006मध्ये हिंदुस्थानात 1 हजार 411 वाघ होते.

2018मध्ये ‘वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ने देशभरातील टायगर रिझर्व्ह, नॅशनल पार्क, अभयारण्ये आणि सामान्य जंगलातील वाघांची गणना केली होती. गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या 774ने वाढली आहे. 2014मध्ये देशात एकूण 2 हजार 226 वाघ आढळले होते, तर 2010मध्ये वाघांची संख्या 1 हजार 706 होती असे ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या सेंट्रल इंडिया शाखेचे संचालक नितीन देसाई यांनी सांगितले.

सर्वाधिक 526 वाघ मध्य प्रदेशात
देशातील सर्वाधिक 526 वाघ हे मध्य प्रदेशात आहेत. यापूर्वी मध्य प्रदेशात 308 वाघ होते. वाघांच्या संख्येत मध्य प्रदेशने कर्नाटकला मागे टाकले आहे. 2011च्या जनगणनेनुसार कर्नाटकात सर्वाधिक वाघ होते. पण आता कर्नाटकातील वाघांची संख्या 406वरून 524 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात 312 वाघ
2014 साली महाराष्ट्रात 190 वाघ होते. पण 2018च्या गणनेनुसार वाघांची संख्या 312वर पोहोचली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. 2006 साली राज्यात 103, 2010मध्ये 168 वाघ होते.

गोव्यात फक्त तीनच
मागच्या वेळेच्या व्याघ्र गणनेत गोव्यातील जंगलात पाच वाघ असल्याचे म्हटले होते. 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या तीन वर आली आहे. उत्तराखंडमधील वाघांची संख्या 340वरून 442 इतकी झाली आहे. तर तामीळनाडूतील वाघांची संख्या 229वरून 264 झाली आहे.