रत्नागिरीत देशी दारुची विक्री घसरली; विदेशी मद्याची मागणी वाढली

liquor Liqueur
प्रतिकात्मक फोटो

रत्नागिरी जिल्ह्यातील दारु विक्रीची आकडेवारी उघड झाली आहे. त्यात देशी दारूची मागणी घटली असून विदेशी मद्याची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात देशी दारूची विक्री 8 टक्क्याने घसरली आहे. अनेकांनी विदेशी दारुकडे आपला मोर्चा वळवला असून विदेशी दारुची विक्री 9 टक्क्यांनी वाढली आहे. बियरच्या विक्रीमध्येही तब्बल 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दारुच्या उलाढालीमध्येही नेहमी चढउतार होत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट महिन्यामध्ये दारुच्या विक्रीची आकडेवारी उघड झाली आहे. जिल्ह्यामध्ये देशी दारुची 60 दुकाने आहेत तर 9 वाईन शॉपमध्ये देशी दारु विकली जाते. अशी एकूण 69 दुकाने देशी दारु विकतात. यंदा एप्रिल ते ऑगस्ट महिन्यापर्यंत 8 लाख 11 हजार 406 लिटर खप झाला. गतवर्षी याच कालावधीत 8 लाख 77 हजार 231 लिटर देशी दारुची विक्री झाली होती. यंदा ही विक्री 8 टक्क्यांनी घसरली आहे. विक्री घसरण्यामागे देशी दारुची किंमत 10 रुपयांनी वाढल्याचे कारण आहे.

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात विदेशी दारू पिण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात विदेशी दारुविक्री करणारे 235 बार आणि 9 वाईन शॉपी आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत 12 लाख 82 हजार 093 लिटर दारुची विक्री झाली. गतवर्षी याच कालावधीत विदेशी दारुची विक्री 11 लाख 75 हजार 559 लिटर झाली. 1 लाख 65 हजार 034 लिटर विक्री वाढली. विदेशी दारुच्या विक्रीमध्ये 9 टक्के वाढ झाली. जिल्ह्यात बियरची विक्री मोठ्या प्रमाणात होते. 143 बियर शॉपीमधून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत 24 लाख 1 हजार 544 लिटर बियरची विक्री झाली. गतवर्षी याच कालावधीत 21 लाख 23 हजार 195 लिटर बियरची विक्री झाली होती. यंदा 13 टक्क्यांनी बियरची विक्री वाढली आहे.